युतीत काहीही मिसळून बेचव करणार नाही – उद्धव ठाकरे, uddhav thackeray appose mns to join maha yuti

युतीत काहीही मिसळून बेचव करणार नाही – उद्धव ठाकरे

युतीत काहीही मिसळून बेचव करणार नाही – उद्धव ठाकरे
www.24taas.com, मुंबई
‘युती’ म्हणजे गिरगावच्या चौपाटीवरील भेळीचे दुकान नव्हे. त्यात काहीही मिसळावे आणि चव बिघडवावी!, असे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामना या वृत्तपत्रातील अग्रलेखात महायुतीत राज ठाकरे यांच्या प्रवेशाला विरोध केला आहे.

युती म्हणजे वडापाव! अस्सल मराठमोळ्या चवीचा. पाव भाजपचा, चवदार वडा शिवसेनेचा आणि आतली चटणी रामदास आठवल्यांची. भेळपुरी, रगडा पॅटिसमध्ये महाराष्ट्राला अजिबात रस नाही. असे म्हणत राज ठाकरे यांना टोला लगावला आहे.
भाजप हा आमचा मित्रच राहील. शेवटी वडापावची चवच न्यारी! तेव्हा महाराष्ट्राच्या राजकारणाची चव आम्ही बिघडू देणार नाही!

मनसेप्रमुखांनी विधानसभेतील विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांच्यावर तोडपाणी व मांडवलीचे आरोप करताच उसळलेल्या खडसे यांनी ‘मनसे’चे काचेचे घर फोडून टाकले. ज्यांचे स्वत:चे घर काचेचे असते त्यांनी दुसर्यांेच्या घरावर दगड मारू नयेत हा साधा व्यवहारी नियम येथे पाळला गेला नाही. त्यामुळे दोन्ही बाजूंनी तडे गेले आहेत, असेही अग्रलेखात नमूद केले आहे.

खडसे यांनी जे दगड मारले त्यास प्रत्युत्तर देताना समोरच्याची दमछाक झाली आहे व आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी संपलेल्या नाहीत. खडसे हे अस्सल गावरान व खान्देशी नेतृत्व असल्याने त्यांच्या वाटेला कुणी जाऊ नये. खडसे एकदा विषय उचलतात व नंतर मिठाची गुळणी घेऊन गप्प बसतात, असा आरोप त्यांच्यावर ‘मनसे’ करीत असेल तर त्यास खडसे यांच्या वतीने उत्तर देण्याची जबाबदारी इतर भाजप नेत्यांची होती, पण खडसे यांना साथ देण्यासाठी इतर नेते सरसावले नाहीत. मात्र खडसे यांनी कसलेल्या पहेलवानाप्रमाणे समोरच्याला उताणे केले, असे नमूद करत एकनाथ खडसे यांची चांगलीच पाठराखण केली आहे.

मुंडे-गडकरी ज्या विशाल महायुतीचा नकाशा रेखाटीत आहेत ते चित्रच खडसे यांनी बिघडवल्याने ‘सबुरीने घ्या, सबुरीने घ्या’ अशी आर्जवे सुरू आहेत. महाराष्ट्राच्या व्यापक हितासाठी व कॉंग्रेसला घालविण्यासाठी विरोधकांचे ऐक्य टिकायला हवे हे मान्य, पण ऐक्य टिकवण्याची जबाबदारी नक्की कुणावर हेदेखील महत्त्वाचे आहे. कारण ती एक सामूहिक जबाबदारी आहे. तेव्हा वाद नको, थांबा, सबुरीने घ्या वगैरे आवाहन ठीक असले तरी सबुरीने कुणी घ्यायचे या प्रश्ना चे उत्तरही मिळायला हवे. पुन्हा ‘युती’ म्हणजे गिरगावच्या चौपाटीवरील भेळीचे दुकान नव्हे. त्यात काहीही मिसळावे व चव बिघडवावी, असा जोरदार टोला मनसेला आणि राज ठाकरेंना लगावला आहे.


वडापाव! अस्सल मराठमोळ्या चवीचा. पाव भाजपचा, चवदार वडा शिवसेनेचा आणि आतली चटणी रामदास आठवल्यांची. भेळपुरी, रगडा पॅटिसमध्ये महाराष्ट्राला अजिबात रस नाही. त्यामुळे आमचे मित्र मुंडे काय किंवा गडकरी यांनी असे घामाघूम होऊन टेन्शन घेण्याची गरज नाही. त्यांनी वडापावची चव, लज्जत घ्यावी. दिल्लीत त्यांना भाजपचा पंतप्रधान बसवायचा आहे व त्यासाठी पंतप्रधानपदाच्या स्पर्धेतील असंख्य उमेदवारांच्या उधळलेल्या अनेक घोड्यांना आवरण्यासाठी प्रयत्न करावे लागणार आहेत, असा सल्लाही मुंडे आणि गडकरींना दिला आहे.

First Published: Thursday, March 14, 2013, 20:49


comments powered by Disqus