सचिनच्या शेवटच्या मॅचची तिकिटविक्री करणारी वेबसाईट क्रॅश!, Website selling tickets for Sachin`s 200t

सचिनच्या शेवटच्या मॅचची तिकिटविक्री करणारी वेबसाईट क्रॅश!

सचिनच्या शेवटच्या मॅचची तिकिटविक्री करणारी वेबसाईट क्रॅश!
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या अखेरच्या टेस्ट मॅचसाठी आजपासून तिकीटविक्रीची सुरूवात होणार होती. मात्र ऑनलाईन तिकीटविक्री करणारी वेबसाईट क्रॅश झाल्यानं सध्या क्रिकेटप्रेमींना तिकीटांसाठी वाट पाहवी लागत आहे

www.kayzooga.com ही वेबसाईट क्रॅश झाल्यानं क्रिकेटप्रेमींची घोर निराशा झाली आहे. या वेबसाईटच्या चेअरमन आणि सीईओ असणाऱ्या नीतू भाटिया यांनी म्हटलं, की MCA च्या मॅचेसची अनेक वर्षांपासून तिकीट विक्री करण्याची संधी आम्हाला मिळाली, याबद्दल आम्हाला अभिमान आहे. विशेष म्हणजे सचिन तेंडुलकर याच्या ऐतिहासिक शेवटच्या मॅचची तिकिट विक्री आम्ही करत आहोत. मात्र, वेबसाईटवर तिकीट मिळवणाऱ्यांची गर्दी वाढल्याने वेबसाईट क्रॅश झाली असावी. यामध्ये काही गौडबंगाल असल्याचा दावा काही क्रिकेटप्रेमी करत आहेत.

वानखेडेवर येत्या ११ नोव्हेंबरपासून सचिन तेंडुलकर आपल्या क्रिकेट करिअरमधली अखेरची टेस्ट खेळणार आहे. त्या टेस्टच्या तिकीटासाठी सचिनच्या चाहत्यांनी वानखेडे स्टेडियमवर रात्रभर रांगा लावल्या होत्या. रात्रभर स्टेडियम प्रशासनाकडून काहीही माहिती सांगण्यात आली नाही. मात्र सकाळी ऑनलाईन तिकीट मिळणार असल्याची माहिती देण्यात आल्यामुळे चाहत्यांनी एमसीए आणि पवारांच्या विरोधात घोषणाबाजी केली गेली होती.

तिकिटांचे दर रु. ५००, रु. १०००, रु. २५०० असे आहेत. प्रत्येक व्यक्तीला केवळ २च तिकिटं बुक करता येणार आहेत. मात्र वेबसाईट क्रॅश झाल्यामुळे तिकिटं मिळण्याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे.


* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.

First Published: Monday, November 11, 2013, 13:53


comments powered by Disqus