Last Updated: Friday, November 30, 2012, 10:44
www.24taas.com, रत्नागिरी ८६ वं अखिल भारतीय साहित्य संमेलन रत्नागिरी जिल्ह्यातल्या चिपळूणमध्ये होतंय. मात्र ज्या ठिकाणी हे संमेलन होणारे आहे त्या ठिकाणची इमारत म्हणजे खरंच सांस्कृतिक केंद्र आहे की गुरांचा कोंडवाडा? असा प्रश्न साहित्यप्रेमींना पडतोय.
चिपळूणमध्ये होणाऱ्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाची तयारी जोरात सुरू आहे. संमेलनासाठी उद्घाटक शरद पवार यांच्यासह अनेक ज्येष्ठ साहित्यिक नाट्यकर्मी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून येणार आहेत. मात्र, ज्या पवन तलाव मैदानावर हे संमेलन होणार आहे त्या मैदानाच्या प्रवेशद्वारावर असणारं इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्र तब्बल सात वर्षांपासून बंद आहे आणि अजूनही त्याची दुरुस्तीला सुरुवात झालेली नाही. रत्नागिरीचे पालकमंत्री आणि नगरविकास राज्यमंत्री भास्कर जाधव हेच सांस्कृतिक केंद्राच्या दुरावस्थेस जबाबदार असल्याचा आरोप माजी आमदार रमेश कदम यांनी केलाय.
इथल्या सांस्कृतिक केंद्रातील खुर्च्या चोरीला गेल्यात... छत कोसळण्याच्या स्थितीत आहे तसंच सर्वत्र घाणीचं साम्राज्य असल्यामुळे हे सांस्कृतिक केंद्र आहे की कोंडवाडा? असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केलीय. आता निदान साहित्य संमेलनाआधी तरी या सांस्कृतिक केंद्राची दुरुस्ती व्हावी, अशी इच्छा चिपळूणवासियांनी व्यक्त केलीय.
First Published: Friday, November 30, 2012, 10:44