Last Updated: Friday, December 13, 2013, 20:28
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई ‘बिग बॉस ७’ सीजनमध्ये आता स्पर्धकांमध्ये चांगलीच चुरस रंगली आहे. सर्व स्पर्धक आपले टास्क लवकरात लवकर कसे पूर्ण करता येतील यावर लक्ष केंद्रीत करत आहेत. या सर्व स्पर्धकांमध्ये कामया आणि संग्रामनं आता आंतरराष्ट्रीय रेकॉर्ड मोडला आहे. बिग बॉसच्या घरा कामया आणि संग्राम हे दोघं टास्क अतिशय योग्यरितीनं पूर्ण करताना दिसत आहे. बिग बॉसनं दिलेलं प्रत्येक कार्य त्यांनी खंबीरपणे पूर्ण केलंय.
बिग बॉसमध्ये यावेळी `लक्झरी बजेट` या टास्कचा एक भाग म्हणून अॅण्डी, संग्राम आणि कामया यांना `बिग बॉक्स` नामक टास्कमध्ये एका मोठ्या बॉक्सच्या आत बसण्याचं कार्य सोपविण्यात आलं होतं. यामध्ये जो स्पर्धक जास्त वेळ बसेल तो `टिकेट टू फिनाले` चा विजेता होईल आणि त्याला `ग्रॅण्ड फिनाले`मध्ये थेट प्रवेश मिळेल. या बॉक्समध्ये १९ तास बसल्यानंतर अॅण्डी बॉक्सच्या बाहेर आला. या तिघांमध्ये तो सर्वात प्रथम बाहेर आला.
संग्राम आणि कामया यांनी बॉक्सच्या आत बसून आपला टास्क चालू ठेवला. हा टास्क करत असताना कामया आणि संग्रामने `बिग ब्रदर` या युकेमधील शोचे रेकॉर्ड मोडीत काढले. `बिग ब्रदर` हा युकेमध्ये बिग बॉस सारखा खेळण्यात येणारा शो आहे. `बिग ब्रदर`मध्ये बिग बॉक्स या टास्कचा रेकॉर्ड २६ तासांचा आहे. हा रेकॉर्ड कामया आणि संग्रामनं मोडून काढला.
त्यावेळी `बिग बॉस` नी घोषणा करुन, त्यांचं अभिनंदन केलं. तसंच घरातील इतर मंडळीनी सुद्धा त्यांचं कौतुक केलं. रेकॉर्ड मोडला तरी सुद्धा कामया आणि संग्रामने `ग्रॅण्ड फिनाले` गाठण्यासाठी हा टास्क चालू ठेवला आहे. आता ते कोणता नवीन रेकॉर्ड तयार करतात, हे पाहणं मजेशीर ठरणार आहे.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Friday, December 13, 2013, 20:14