Last Updated: Wednesday, May 30, 2012, 12:03
www.24taas.com, मुंबई इंडियन आयडॉल – ६ मध्ये अनु मलिक, सुनिधी चौहान आणि सलीम मर्चंट यांच्यासोबत संगीतक्षेत्रातली आणखी एक हस्ती आपल्याला सेटवर पाहायला मिळेल. ती व्यक्ती म्हणजे दुसरं तिसरं कुणी नसून खुद्द आशा भोसले आपल्याला ‘जज’च्या भूमिकेत दिसतील.
छोट्या पडद्यावरचा लोकप्रिय शो ‘इंडियन आयडॉल’ सहावा भाग घेऊन लवकरच प्रेक्षकांसमोर हजर होणार आहे. त्यासाठी वेगवेगळ्या शहरांतून ऑडिशन घ्यायलाही सुरुवात झालीय. १ जूनपासून हा कार्यक्रम सोनी चॅनलवर प्रसारित होणार आहे. याच कार्यक्रमात आता ‘चौथा जज’ म्हणून आशाताई स्पर्धकांची परीक्षा घेणार आहेत. आशाताई म्हणतात. ‘कोणत्याही स्पर्धकाचं परिक्षण करण्यासाठी माझं पहिलं लक्ष असेल ते त्याच्या सुराकडे. सूर हा कोणत्याही गाण्याचा केंद्रबिंदू असतो. पूर्णत: प्रशिक्षित नसलेले गायक मला फारसे आवडत नाहीत. गायकांनी शास्त्रीय संगीताचा अभ्यास करणं अतिशय महत्त्वाचं आहे. कारण त्यामुळे गाण्यातील कोणतीही जागा ते बिनचूकपणे गाऊ शकतात. पाया मजबूत असेल तरच इमारत अधिक काळापर्यंत उभी राहू शकते. त्याचप्रमाणे शास्त्रीय संगीत हा संगीताचा पाया आहे.’
सगळ्यात जास्त गाणी गाण्याचा विक्रम आपल्या नावावर नोंदवणाऱ्या आशाताईंना इंडियन आयडॉल – ६ च्या सेटवर 'जज'च्या भूमिकेत पाहणं ही स्पर्धकांसाठी आणि प्रेक्षकांसाठी पर्वणीच असेल, यात काही शंकाच नाही.
.
First Published: Wednesday, May 30, 2012, 12:03