‘खतरों के खिलाडी’मध्ये 'बाजीराव सिंघम' - Marathi News 24taas.com

‘खतरों के खिलाडी’मध्ये 'बाजीराव सिंघम'

www.24taas.com, मुंबई
 
खिलाडी अक्षय कुमार ‘खतरों के खिलाडी’ या लोकप्रिय कार्यक्रमाच्या नव्या सीझनमध्ये दिसणार नाही, अशी चर्चा बऱ्याच दिवसांपासून सुरू होती. यावर या कार्यक्रमाच्या निर्मात्यांनी आता शिक्कामोर्तब केलंय. आता खतरों के खिलाडी या कार्यक्रमाचा निवेदक म्हणून आपल्या सर्वांचा लाडका ‘बाजीराव सिंघम’ दिसणार आहे.
 
‘फियर फॅक्टर’चा भारतीय अवतार असलेल्या ‘खतरों के खिलाडी’ या कार्यक्रमात अक्षय कुमार गेल्या तीन वर्षांपासून स्मॉल स्क्रिनवर दिसत होता. पण, आता मात्र त्याला त्याच्या कुटुंबासोबत वेळ घालवायचाय. त्यामुळे त्यानं या कार्यक्रमापासून फारकत घेतलीय. अक्षय आणि त्याची पत्नी – अभिनेत्री ट्विंकल खन्ना त्यांच्या दुसऱ्या अपत्याच्या प्रतिक्षेत आहेत. ज्यावेळी हे बाळ जन्माला येणं अपेक्षित आहे नेमकं त्याच दरम्यान या कार्यक्रमाचं शूटींग सुरू होणार आहे.
 
त्यामुळेच निर्मात्यांनी जॉन अब्राहम आणि अजय देवगण यांच्याशी संपर्क साधणं सुरू केलं होतं. पण, जॉनचं शेड्युल मात्र भलतंच बिझी निघालं. तो लागोपाठ चार सिनेमांच्या शूटींगमध्ये व्यस्त असल्यानं त्याला काही या कार्यक्रमासाठी वेळ देणं शक्य नाही. त्यामुळे मग शेवटी निर्मात्यांनी अजय देवगणला गाठलंच. ‘सिंघम’ सिनेमाद्वारे अजय देवगण बऱ्याच वर्षानंतर पुन्हा एकदा अक्शन हिरोच्या रुपात लोकांच्या समोर आलाय. त्यामुळे आता आपल्याला ‘बाजीराव सिंघम’ छोट्या पडद्यावर पाहायला मिळणार हे नक्की... लवकरच, या कार्यक्रमाच्या शूटींगला सुरूवात होणार आहे.
 

First Published: Friday, July 6, 2012, 16:47


comments powered by Disqus