मराठी मंदार देवस्थळीची हिंदी झेप - Marathi News 24taas.com

मराठी मंदार देवस्थळीची हिंदी झेप

झी २४ तास वेब टीम, मुंबई
सोनीवरील 'कुछ तो लोग कहेंगे' या मालिकेचं दिग्दर्शन मंदार देवस्थळी हा मराठी तरुण करतोय. अनेक लोकप्रिय मराठी मालिकांचं दिग्दर्शन केल्यावर मंदार आता हिंदीकडे वळला आहे. मराठीमध्ये प्रेम आणि कौटुंबिक विषय हाताळल्यानंतर हिंदीमध्ये मात्र वेगळ्याच विषयावरील मालिकेसाठी मंदार तयार झाला आहे.
'आभाळमाया', 'वादळवाट', 'कालाय तस्मै नम:', 'झुंज', 'मायलेक', 'वसुधा', 'आपली माणसं', 'अवघाचि संसार' या मालिकांमधून मंदारच्या दिग्दर्शनाने प्रेक्षकांना आपलंसं केलं आहेच. ' कुछ तो...'पासून त्याच्या दिग्दर्शनाचा हिंदीमध्ये श्रीगणेशा झाला आहे. केवळ हिंदीमध्ये काम करायचंय म्हणून काम करायचं नव्हतं. चांगल्या विषयाची आणि संधीची वाट बघत होतो, असं मंदारने सांगितले.
'कुछ तो...' सारखा विषय हाताळून हिंदी चॅनलने खरंतर धाडसच केलंय. तसंच आता मराठीनेही असं धाडस करायला हवं. मराठीमध्ये अशा विषयांवर काम करायला नक्की आवडेल', असं मंदार सांगतो. 'वादळवाट', 'कालाय तस्मै नम:' आणि 'आपली माणसं' या मालिकांप्रमाणे 'कुछ तो...'मध्ये मात्र मंदार भूमिका करणार नाहीये. मंदार प्रेक्षकांच्या लक्षात आला ते 'वादळवाट' मालिकेमुळे. मालिकेच्या दिग्दर्शनामुळेच ती मालिका अधिकच रंगत गेली.
मोहनीश बेहल आणि आलोकनाथ यांसारख्या हिंदी कलाकारांना डिरेक्ट करताना मंदार खूप उत्सुक आहे. साध्या, सोप्या पण हट के पद्धतीने विषय मांडण्याची मंदारची स्टाइल प्रेक्षकांच्याही ओळखीची झाली आहे. त्यामुळे या हिंदी मालिकेच्या दिग्दर्शनातही तो काय मजा आणतो, हे बघायला प्रेक्षकही उत्सुक आहेत.

First Published: Friday, October 21, 2011, 18:06


comments powered by Disqus