एका लग्नाच्या दुसऱ्या गोष्टीत.... अखेर लग्न - Marathi News 24taas.com

एका लग्नाच्या दुसऱ्या गोष्टीत.... अखेर लग्न

www.24taas.com
 
एका लग्नाची दुसरी गोष्ट या मालिकेत अखेर घना-राधा बोहल्यावर चढले आहेत. सप्तपदी, मंगलविधी, सनई-चौघडे, यामुळे या दोघांच्या लग्नाचा थाट काही औरच असल्याचं दिसून आलं. या आनंदसोहळ्यात सगळेच सामील झाले आहेत.
 
त्यामुळे लगीनघाई सुरू झाली आहे ती घना-राधाच्या लग्नाची. लग्नमंडपात काळे कुटुंबाच्या आनंदाला उधाण आलं आहे. तर नववधूच्या रुपात राधादेखिल खूशीत दिसली. नाही नाही म्हणता घना-राधा विधिवत लग्नासाठी तयार झाले होते आणि ज्या क्षणाची काळे आणि देसाई कुटुंब वाट पाहत होते ती लग्नघटिका निर्विघ्नपणे पार पडली. आप्तेष्टांच्या साक्षीने हे लग्न पार पडलं.
 
हल्ली प्रत्येक मालिकेत लग्नसोहळा भव्यदिव्य पध्दतीने करण्याचा ट्रेण्ड आला आहे आणि हेच चित्र या मालिकेतही पाहायला मिळालं. मग तो मंगळसुत्राची विधी असो. कान पिळणं असो, किंवा सप्तपदी. हे सारं काही या मालिकेत सहजपणे पाहायला मिळालं. मंगळसुत्र घालताना घनाची थोडी दमछाक होते तर बिच्चाऱ्या मानवलाच घनाचा कान पिळायला सांगतात.
 
सप्तपदी चालताना घना-राधाला थोडं टेन्शन येतं मात्र भटजी प्रत्येक पाऊलाचं महत्व घना-राधाला समजावून सांगतात. एकूण आता घना-राधा सात जन्माच्या गाठीमध्ये बांधले गेले आहेत. मात्र नेहमी आपल्याला इतरांपेक्षा वेगळे मानणारे घना-राधा या लग्नानंतर मालिकेत कुठला ट्विस्ट तर आणणार नाहीत नाही याची उत्सुकता स्मॉल स्क्रीनच्या प्रेक्षकांना लागून राहिली आहे.
 
 
 

First Published: Monday, March 19, 2012, 07:43


comments powered by Disqus