वीरेंद्र सेहवाग, लक्ष्मणला सीएट पुरस्कार - Marathi News 24taas.com

वीरेंद्र सेहवाग, लक्ष्मणला सीएट पुरस्कार

झी २४ तास वेब टीम, मुंबई 
 
भारताचे विराट कोहली, गौतम गंभीर, व्ही. व्ही. एस. लक्ष्मण आणि वीरेंद्र सेहवाग यांना सीएटचे विविध पुरस्कार मिळाले, परंतु मुख्य पुरस्कारांमध्ये इंग्लंडच्या खेळाडूंनी बाजी मारली.
 
ऍशेस मालिका जिंकणाऱ्या आणि टीम इंडियाकडून कसोटी क्रिकेटमधील अव्वल स्थान हिसकावून घेणाऱ्या इंग्लंडने यंदाच्या सीएट पुरस्कारावर वर्चस्व राखले. वेस्ट इंडीजचा माजी वेगवान गोलंदाज कोर्टनी वॉल्श यांना जीवनगौरव पुरस्काराने गौरविण्यात आले. क्रिकेट रेटिंगमधील सर्वांत जुनी क्रमवारी असा लौकिक असणाऱ्या सीएट क्रिकेट ऑफ दि ईयर हा पुरस्कार सोहळा मुंबईत झाला.
 
२०१०-११ या मोसमात भारताने विश्‍वकरंडक जिंकलेला असला, तरी या वर्षातील एकूणच क्रिकेटवर इंग्लंडने आपली छाप पाडलेली आहे आणि त्यांच्या या यशातील शिलेदार जोनाथन ट्रॉट याला सर्वोत्तम फलंदाज आणि सर्वोत्तम क्रिकेटपटू असे दोन पुरस्कार मिळाले; तर सर्वोत्तम गोलंदाजाचा पुरस्कार जेम्स अँडरसन याला मिळाला.
पुरस्कार स्वीकारल्यानंतर लक्ष्मण आणि सेहवाग यांनी टीम इंडियाच्या ड्रेसिंग रूममधील काही आठवणी जागविल्या. फलंदाजी करीत असताना आपण मनात 'चला जाता हूँ किसी की धून में...' हे गाणे गुणगुणत असतो, त्यामुळे प्रत्येक चेडू खेळताना माझ्यावर कोणतेही दडपण नसते, अशी कधीही न उघड केलेली आठवण सेहवागने सांगितली.
पुरस्कारविजेत्यांमध्ये सर्वोत्तम क्रिकेटपटू - जोनाथन ट्रॉट, सर्वोत्तम फलंदाज - जोनाथन ट्रॉट, सर्वोत्तम गोलंदाज - जेम्स अँडरसन, सर्वोत्तम नवोदित खेळाडू - विराट कोहली, सर्वोत्तम ट्‌वेंटी-२० खेळाडू - सुरेश रैना, मॅच विनिंग कामगिरी - गौतम गंभीर, विशेष पुरस्कार - व्ही. व्ही. एस. लक्ष्मण, वीरेंद्र सेहवाग, जीवनगौरव पुरस्कार - कोर्टनी वॉल्श यांचा समावेश आहे.

First Published: Sunday, November 20, 2011, 10:21


comments powered by Disqus