आकाश - २ `चायना माल`?, Aakash 2 - Made in China?

आकाश - २ `चायना माल`?

आकाश - २ `चायना माल`?
www.24taas.com, नवी दिल्ली

जगातला सगळ्यात स्वस्त टॅबलेट म्हणून आकाश-२ चा बराच बोलबाला झाला. पण, याच ‘आकाश – टू’बद्दल सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का देईल, असा एक नवा खुलासा झालाय. एका बातमीनुसार, हा टॅबलेट भारताचं उत्पादन नसून चीनचं आहे.

‘हिंदुस्तान टाईम्स’ या वर्तमानपत्रात हा खुलासा करण्यात आलाय. या वृत्तपत्राच्या बातमीनुसार ‘डाटाविंड’चे संस्थापक सुनीत आणि राजा सिंह टुली यांनी हा टॅबलेट चीनमधून केवळ २२६३ रुपयांना मूळ निर्मात्यांकडून खरेदी केलेला आहे आणि त्याच किंमतीला या टॅबलेटला भारत सरकारनं विकत घेतलंय.

या बातमीनुसार, २६ ऑक्टोबर आणि ७ नोव्हेंबर या दरम्यान शेनझेन आणि हाँगकाँगच्या चार निर्मात्यांकडून जवळपास १०,००० ‘ए-१३’ टॅबलेटसची खरेदी करण्यात आलीय. तसंच मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या नियमांनुसार हे सर्व टॅबलेट कोणत्याही प्रकारचा कर भरल्याशिवाय भारतात दाखल झाले, कारण हे टॅबलेट शैक्षणिक कारणांसाठी भारतात आले होते. ‘डाटाविंड’नं भारतातील विद्यार्थ्यांना एक लाख टॅबलेट उपलब्ध करून देण्याची बोली जिंकली होती. करारानुसार, हे सर्व टॅबलेट भारतात बनवले जाणं गरजेचं होतं.

परंतू, डाटाविंडनं कराराला धाब्यावर बसवत शेनझेन शिन्टाँग झाओली टेक्नोलॉजी, डैजेन इंटरनॅशनल इलेक्ट्रॉनिक्स, किलाँग टेक्नॉलॉजी तसंच ट्रेंड ग्रेस लिमिटेड या चार वेगवेगळ्या निर्मात्यांकडून हे टॅबलेटस बनवून घेतले आहेत. कंपनीशी निगडीत एक सूत्रानं दिलेल्या माहितीनुसार, डाटाविंडला टॅबलेटच्या डिझाईन किंवा त्याच्या निर्मितीशी काहीएक देणं-घेणं नाही.

दरम्यान, मुख्य कार्यकारी अधिकारी सुनीत सिंह टुली यांनी सगळे आरोप फेटाळून लावलेत. ‘आकाश-टू’ची डिझाईन आणि निर्मिती आपल्याच कंपनीतून झाल्याचा दावाही त्यांनी केलाय.

First Published: Saturday, November 24, 2012, 21:19


comments powered by Disqus