Last Updated: Tuesday, March 19, 2013, 07:29
www.24taas.com, मुंबईगेल्या 41 दिवसांपासून एमफुक्टोने पुकारलेला बहिष्कार चिघळला आहे. मंगळवारपासून कोणतीही परीक्षा होऊ देणार नाही असा पवित्रा संघटनेने घेतला असून यामुळे सुरु असलेले बीएस्सी प्रात्यक्षिक आणि टीवाय बीकॉमच्या परीक्षा अडचणीत येण्याची शक्यता आहे.
मुंबईत विद्यार्थ्यांच्या परीक्षांना लागलेलं ग्रहण सुटता सुटत नाहीय. उलट मंगळवारपासून विद्यार्थ्यांच्या परीक्षांचा प्रश्न आणखी चिघळलाय. एमफुक्टोच्या प्राध्यापकांनी थेट विद्यापीठातच आंदोलन तीव्र करत मंगळवारपासून एकही परीक्षा होऊ न देण्याचा पवित्रा घेतलाय. तसंच ज्या परीक्षा सुरू आहेत, त्या युजीसीच्या नियमांनुसार होत नसल्याचाही त्यांचा आरोप आहे.
एमफुक्टोच्या या हटवादी भूमिकेमुळे ज्याठिकाणी प्रात्यक्षिकं होत आहेत, तीही थांबवावी लागणार आहेत. इतकंच नाही तर 28 मार्चपासून सुरु होणा-या टीवायबीकॉमच्या परीक्षेवरही बहिष्काराचं सावट आहे.
हा सगळा संघर्ष संघटना आणि विद्यापीठ यांच्यात सुरु असला तरी महाविद्यालयांची जबाबदारी असणा-या विद्यापीठाला काही सवाल विचारले जात आहेत. परीक्षा घेण्यासाठी पुरेसे प्राध्यापक नाहीत हे माहीत असतनाही विद्यापीठानं प्रात्यक्षिक परीक्षा का होऊ दिली? ज्या ठिकाणी परीक्षा झाल्या नाहीत त्या ठिकाणी परीक्षा कधी होणार ? एफवाय, एसवायच्या परीक्षेच्या वेळापत्रकाच्या घोळाला जबाबदार कोण ?
परीक्षेच्या काळात पुस्तकांमध्ये व्यस्त असणारे विद्यार्थ्यी सध्या बहिष्कार आणि वेळापत्रकाच्या घोळात अडकले आहेत. सरकार, प्राध्यापक संघटना आणि विद्यापीठ शिक्षण व्यवस्था या तिघांनाही विद्यार्थ्यांच्या समस्या कळतील का?
First Published: Monday, March 18, 2013, 20:00