`फेसबुक`मुळं अनाथ उषाला मिळालं नवं घर!, facebopk gives her new home

`फेसबुक`मुळं अनाथ उषाला मिळालं नवं घर!

`फेसबुक`मुळं अनाथ उषाला मिळालं नवं घर!

www.24taas.com, झी मीडिया, झारखंड

लहानपणीच आई-वडिलांच्या मायेचं छत्र हरवलेल्या... शेतात गुरं राखणाऱ्या उषाच्या जीवनाला फेसबुकमुळे नवं वळण मिळालंय. सोशल मीडियाचा वापर संवेदनशीलपणे केला तर काय घडू शकतं, याचंच हे उदाहरण...

ही कहाणी आहे झारखंडमधील एका अनाथ मुलीची... झारखंडच्या बोकरो जिल्ह्यातील चंद्रपुरा तालुक्यातील कुरूंबागावामध्ये राहणाऱ्या उषाची कहानी ही एखाद्या परिकथेपेक्षा वेगळी नाही. दहावीची परीक्षा देण्याचं स्वप्न पाहणाऱ्या उषाकुमारीच्या आई-वडिलांचं तीन वर्षांपूर्वीच निधन झालंय. यावेळी, उषा अवघ्या ११ वर्षांची होती. तिच्या पालनपोषणाची जबाबदारी तिच्या आत्यानं उचलली. पण घरात अठराविश्वे दारिद्र्य असणाऱ्या आत्याला तिच्या शिक्षणाचा खर्च कसा परवडणार? आत्याच्या घरी उषा गुरं राखण्याचं काम करत होती.

याही परिस्थितीत उषा शिक्षण घेत राहिली. पण शिक्षणाची भूक तिला स्वस्थ बसू देईना! उषा शिक्षणाच्या ध्येयानं प्रेरित झाली होती. ती मॅट्रिकपर्यंत शिक्षण घेत राहिली. जेव्हा मॅट्रिकची परिक्षा द्यायची होती तेव्हा फॉर्म भरण्यासाठीसुद्धा उषाकडे पैसे नव्हते. `फी` या एका शब्दानं तिच्या स्वप्नांचा चक्काचूर करून टाकला. उषाने पुढे शिक्षण थांबवण्याचा निर्णय घेतला खरा, पण तिच्या मनात एक विचार आला... चला, सरकार इतक्या योजना स्त्री शिक्षणासाठी करते तर आपणही जाऊन पाहुयात आपल्या शिक्षणासाठी काही मदत मिळते का?

मनातलं प्रश्नांचं काहूर घेऊन उषाने गटविकास अधिकाऱ्याचे ऑफिस गाठलं. हे गटविकास अधिकारी म्हणजे पवन कुमार महंतो... गटविकास अधिकाऱ्यांच्या ऑफिसातील कर्मचाऱ्यांचा राबता मोठा... कामाचा व्याप मोठा... त्यामुळं पवन कुमार महंतो यांनी उषाला पहिल्यांदा बाहेर वाट पाहायला सांगितलं. उषा तिथं रात्री उशीरापर्यंत वाट पाहत राहिली. पवन कुमार महंतो जेव्हा आपलं काम आटोपून बाहेर निघाले तेव्हा त्यांच्या सहकर्मचाऱ्यांनी त्यांना सांगितली की, एक मुलगी इथ बसली होती आणि ती रडत होती. हे ऐकून महंतो यांचं मन हेलावलं. त्यांनी उषाला मदत करण्याचं ठरवलं.

महंतो यांनी शक्य असणाऱ्या सर्व सरकारी योजनेत उषा कुठं बसते का ते पाहिलं? सगळ्या योजनांमध्ये मुख्य अडथळा होता तो उषाच्या वयाचा. हा सारा किस्सा पवन कुमारांनी फेसबुक अकाउंटवर आपल्या मित्रांशी शेअर केला. त्यात एका मित्राने उषाला दत्तक घेण्याचा सल्ला दिला. पवन कुमारांनाही हा सल्ला आवडला आणि पवन कुमारांनी उषाला दत्तक घेतलं.

बघता बघता उषाचं नशिबच पालटलंय! आता उषाच्या शिक्षणाची चिंता मिटलेली आहे. आपला दहावा वाढदिवस साजरा करणाऱ्या फेसबुक कायमच वेगवेगळ्या मतप्रवाहात हेलकावे खात राहिलं आहे. बरेच चांगेलवाईट परिणाम फेसबुकमुळे झालेले आहेत. फेसबुकमुळे कधी नात्यांची वीण आणखी घट्ट झाली तर कधीकधी नातं तोडायलाही कारणीभूत ठरली. झारखंडच्या एका गटविकास अधिकाऱ्याने फेसबुक संवेदनशीलपणे हाताळून एक नवीन पायंडा पाडला आहे. परिकथेतील जादूच्या छडीची ताकद फेसबुकच्या एका स्‍टेटस अपडेटमध्ये आहे, हेही या घटनेतून समोर आलंय.




इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Tuesday, February 11, 2014, 22:09


comments powered by Disqus