Last Updated: Thursday, November 8, 2012, 17:54
www.24taas.com,नवी दिल्लीमोबाईल कंपन्या आपल्याकडे ग्राहक खेचण्यासाठी नवनवीन फंडा शोधत असतात. काहीवेळी कॉल दरात कपात करून ग्राहक वाढविण्यावर भर असे. मात्र, कंपन्यांना याला फाटा द्यावा लागणार आहे. कारण आता केंद्र सरकारने मोबाईल कंपन्यांना एक रकमी शुल्क भरण्यासंदर्भात विचार केला आहे. त्यामुळे मोबाईल सेवा पुरविणाऱ्या कंपन्या कॉल दरात वाढ करण्याची शक्यता आहे.
केंद्रीय मंत्रिमंडळाने सर्व मोबाईल कंपन्यांनी स्पेक्ट्रम शुल्क एक रकमी भरावे, असा निर्णय घेतला आहे. या निर्णयाला मंजुरीही दिली आहे. त्यामुळे मोबाईल कंपन्या मोबाईलच्या कॉल रेटमध्ये वाढ करण्याची शक्यता आहे. आधीच महागाईने त्रस्त असलेल्या जनतेला कॉल दराचा चटका बसणार आहे.
पंतप्रधान मनमोहनसिंग यांच्या अध्यक्षतेखालील मंत्रिगटाच्या एका समितीने सर्व मोबाईल कंपन्यांकडून एक रकमी स्पेक्ट्रम शुल्क वसूल करण्याची शिफारस केली होती. मंत्रिमंडळ बैठकीत ही शिफारस मान्य करण्यात आली आहे. त्यामुळे मोबाईल कंपन्यांवर साधारण ३१ हजार कोटींचा भार पडणार आहे. मोबाईल कंपन्या स्पेक्ट्रम शुल्क भार ग्राहकांकडून वसूल करण्याची शक्यता आहे. त्यामुळे याचा परिणाम कॉल रेट वाढविण्यावर होईल, अशी चर्चा आहे.
First Published: Thursday, November 8, 2012, 17:40