Last Updated: Sunday, April 20, 2014, 15:00
www.24taas.com, झी मीडिया, मुंबईतुम्ही मोबाईलवरून कुणालाही त्रास दिला, तर तुमचं मुक्काम पोस्ट पोलिस स्टेशन ठरलेलं आहे, असं या बातमीवरून स्पष्ट होतंय.
एका खासगी कंपनीत व्यवस्थापक पदावर काम करणाऱ्या तरुणीला अचानक `व्हॉट्स अॅप`वर अश्लील संदेश आणि व्हिडीओ येऊ लागल्याने ती हैराण झाली होती. संबंधित मोबाइल क्रमांक ओळखीचा नव्हता.
तरीही पोलिसांनी मोबाइल क्रमांकावरून संबंधित तरुणाला शोधून काढून अटकही केली. मात्र आपला क्रमांक त्याच्याकडे कसा आला, याचा उलगडा झाला तेव्हा ती गोंधळली.
या प्रकरणातील तरुणी गोव्याला फिरण्यासाठी गेली होती. त्यावेळी तिच्या मोबाइलमधील शिल्लक संपली. त्यामुळे मैत्रिणीला फोन करण्यासाठी तिने तेथे फिरण्यासाठी आलेल्या एका तरुणाकडून मोबाईल घेतला.
काही वेळानंतर या तरुणाने संबंधित मैत्रिणीला फोन करून, आपली मैत्रीण माझ्याकडे काही वस्तू विसरली आहे, असे सांगून तिचा क्रमांक मिळविला. हैदराबाद येथे कामानिमित्त गेलेल्या या तरुणाने तेथून या क्रमांकावर अश्लील संदेश, व्हिडिओ पाठविण्यास सुरुवात केली होती.
या तरुणीने या प्रकरणी गुन्हा दाखल केल्यानंतर गुन्हे अन्वेषण विभागाच्या अंधेरी युनिटचे वरिष्ठ निरीक्षक दीपक फटांगरे, सुनील माने, संजय मोरे, हनुमंत जोशी आदींच्या पथकाने मोबाईल क्रमांकावरून शोध घेऊन मोहम्मद अझीम मोहम्मद पीर शेख याला वांद्रे कुर्ला संकुल येथील आयकर भवनसमोर अटक केली.
अँटॉप हिल येथील नुरा नगरात राहणारा शेख हा फ्रिज आणि एअरकंडिशन दुरुस्तीचे काम करीत असल्याचे निष्पन्न झाले. दरम्यान, तरुणींनी दुसऱ्या व्यक्तीचा मोबाईल फोन वापरताना काळजी घेण्याची आवश्यकता असल्याचे वरिष्ठ निरीक्षक दीपक फटांगरे यांनी सांगितलं आहे.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Sunday, April 20, 2014, 12:47