व्यवस्थापनाच्या आलं मनी, इंटरनॅशनल स्कूलसाठी बंद मराठी `रॉबर्टमनी` Robertmoney marathi Medium school closed down

व्यवस्थापनाच्या आलं मनी, इंटरनॅशनल स्कूलसाठी बंद मराठी `रॉबर्टमनी`

व्यवस्थापनाच्या आलं मनी, इंटरनॅशनल स्कूलसाठी बंद मराठी  `रॉबर्टमनी`
www.24taas.com, मुंबई

दक्षिण मुंबईमधील ग्रँट रोड येथील १७७ वर्षं जुनं रॉबर्टमनी तांत्रिक विद्यालय आणि मराठी माध्यमाचं कनिष्ठ महाविद्यालय व्यवस्थापनाने बंद केलं आहे. महर्षी धोंडो केशव कर्वे ज्या शाळेत शिकले होते, ती ही मराठी माध्यमाची शाळा बंद करून त्याजागी ‘एज्युबर्ग इंटरनॅशनल स्कूल’ सुरु झालं आहे. या शाळेची वार्षिक फी तीन लाखांहूनही जास्त आहे.

ही शाळा बंद करण्याचा प्रयत्न गेल्या दहा वर्षांपासून होत असल्याचं म्हटलं जात आहे. शाळेच्या व्यवस्थापनानेच विद्यार्थ्यांच्या अभ्यासात अडथळे आणण्यास सुरूवात केली होती. प्रयोगशाळेची डागडुजी बरीच वर्षं केलीच नव्हती. इमारतीची दुरूस्ती खोळंबली होती. विद्यार्थ्यांना साहित्य सामुग्री पुरवली जात नव्हती. या सर्व कारणांमुळे विद्यार्थ्यांची गळती सुरू झाली आणि शाळा अनुदानित असूनही विद्यार्थीसंख्या कमी होत असल्याचं कारण पुढे करत मराठी माध्यमाची शाळा बंद करण्यात आली.

रॉबर्टमनी शाळा ही दक्षिण मुंबईतील काही महत्वाच्या मराठी माध्यमाच्या शाळांपैकी एक होती. आचार्य प्रल्हाद केशव अत्रे यांनीही काही काळ या शाळेत शिक्षकाची नोकरी केली होती. या शाळेत मध्यमवर्गीय तसंच कष्टकरी वर्गातील मुलं शिकत होती. आता इंटरनॅशनल स्कूल बनल्यामुळे गरीब विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा प्रश्न निर्माण झाला आहे. सध्या या शाळेचं अस्तित्व टिकावं यासाठी शाळेचे बरेच आजी-माजी विद्यार्थी लढा देत आहेत.

First Published: Sunday, December 23, 2012, 18:35


comments powered by Disqus