नव मानवाचा जन्म ४४ हजार वर्षांपूर्वीच - Marathi News 24taas.com

नव मानवाचा जन्म ४४ हजार वर्षांपूर्वीच

www.24taas.com, लंडन
 
एका नव्या संशोधनानुसार ४४ हजार वर्षांपूर्वीच अधुनिक मानवाचा जन्म झाला होता. ब्रिटन, फ्रांस, इटली, नॉर्वे आणि अमेरिका येथील पुरातत्व शास्त्रज्ञांनी या संदर्भात दक्षिण आफ्रिकेच्या सीमेवरील केव या प्रांतात संशोधन केलं. पुरावे गोळा केले आणि यातून त्यांच्या लक्षात आले, की ४४ हजार वर्षांपूर्वी माणूस दागिने आणि शस्त्र वापरत होता.
 
‘डेली मेल’मध्ये दिलेल्या बातमीनुसार माती उकरणारं हत्यार, विष लावलेलं हत्यार तसंच शहामृगाच्या अंड्याच्या कवचापासून आणि शंख शिंपल्यांपासून बनवलेले दागिने उत्खननात सापडले आहेत. या वस्तू ४४ हजार वर्षांपूर्वीच्या असल्याचं सांगण्यात येत आहे. हे पुरावे सापडण्यापूर्वी पहिला अधुनिक मानव दक्षिण आफ्रिकेत २० हजार वर्षांपूर्वी निर्माण झाल्याचं मानलं जात होतं.
 
या संशोधनातील एक शास्त्रज्ञ डॉ. लुसिंडा बॅकवेल म्हणाले, “दक्षिण आफ्रिकेतील केव प्रांतात संशोधन करताना आम्हाला ४४ हजार वर्षांपूर्वीचे अवशेष सापडले आहेत. यातून ४४ हजार वर्षांपूर्वी माणसाचं विकसित रूप निर्माण झालं होतं, या विधानाला पुष्टी मिळते.”
 
 

First Published: Wednesday, August 1, 2012, 08:19


comments powered by Disqus