Last Updated: Sunday, August 5, 2012, 13:24
www.24taas.com, मुंबई 
जन्मजात हृदयविकाराने त्रस्त असलेल्या २९ वर्षीय नीलेश या तरुणावर वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्समधील एशियन हार्ट इन्स्टिट्यूटमध्ये रोबोच्या सहाय्याने यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. चिरफाड न करता दोन सेंटीमीटरची छिद्रे करून ही शस्त्रक्रिया अचूकपणे करण्यात आली. ज्येष्ठ हृदयशल्यविशारद डॉ. रमाकांत पांडा यांच्या नेतृत्वाखाली झालेली ही मुंबईतील पहिली रोबोटिक हृदय शस्त्रक्रिया ठरली.
नीलेशच्या हृदयातील पडद्याला छिद्र पडले होते. त्यामुळे शुद्ध व अशुद्ध रक्त एकमेकांमध्ये मिसळून त्याच्या जीवाला धोका उत्पन्न झाला होता. तरुण वयात ओपन हार्ट शस्त्रकिया होऊ नये अशी या तरुणाची इच्छा होती. त्यामुळे त्याच्यावर रोबोटिक शस्त्रक्रिया केली गेली. डॉ. पांडा यांच्यासह डॉ. सुधीर श्रीवास्तव यांनी या शस्त्रक्रियेत भाग घेतला.
बायपास शस्त्रक्रियेमध्ये हृदय पूर्ण उघडावे लागते.
रोबोटिक शस्त्रक्रियेत काही छिद्रांमधून उपकरणे हृदयापर्यंत नेऊन शस्त्रक्रिया केली जाते. यात किमान रक्तस्राव होतो. त्यामुळे रुग्ण लवकर बरा होतो आणि व्रणही कमी राहतात. रुग्णाला दोन दिवसांत घरी पाठवता येते, असे डॉ. पांडा यांनी सांगितले.
First Published: Sunday, August 5, 2012, 13:24