Last Updated: Friday, December 23, 2011, 19:39
झी २४ तास वेब टीम, मुंबई लावा मोबाईल्स कंपनीने अनब्रेकेबल म्हणजेच न तुटणाऱ्या ए 16 या फोनची सिरीज लँच केली. लावाचा फोन १२० किलोचा तडाखा सहन करु शकतो आणि त्याची किंमत ४००० ते ५००० रुपयां दरम्यान आहे. एमटीव्ही या टेलिव्हिजन चॅनलसोबत ही सेलफोनची सिरीज लँच करण्यात आली आहे. एमटीव्हीने स्टाईल आणि डिझाईनचे पाठबळा या सिरीजसाठी दिलं. देशात वेगाने वाढणारी युवा वर्गाची बाजारपेठ डोळ्या समोर ठेऊन या सिरीज निर्मिती केली असल्याचं कंपनीच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं. हा फोन विकसीत करण्यासाठी कंपनीला ४.५ दशलक्ष रुपये खर्च आल्याचंही कंपनीने म्हटलं आहे.
कंपनीच्या चीनमधील विकास आणि संशोधन विभागाने ही सिरीज विकसीत केली आहे. या फोनमध्ये ३.२ मेगापिक्सेल कॅमेरा आणि २.६ इंच हाय रेझोल्युशन स्क्रीन तसंच फेसबुक कनेक्ट करता येणार आहे. प्रायव्हसी जपण्यासाठी एसएमएस आणि पिक्चर लॉक करण्याची सेटिंग या फोनमध्ये उपलब्ध करुन देण्यात आली आहेत. जानेवारी ते मार्च या तिमाहीत पाच ते सहा लाख युनिटची विक्री होईल अशी कंपनीला अपेक्षा आहे. पुढच्या तीन तिमाहीत १५ लाख युनिटची विक्रीचं उद्दिष्ट कंपनीने डोळ्यासमोर ठेवलं आहे. सध्या या फोनची निर्मिती चीनमध्ये करण्यात येत आहे पण लवकरच त्यासाठी भारतात नवा कारखाना उभारण्यात येईल असं कंपनीने म्हटलं आहे.
First Published: Friday, December 23, 2011, 19:39