Last Updated: Monday, September 26, 2011, 15:44
झी २४ तास वेब टीम, पॅरीस
अणुच्या गाभ्यात लपलेले न्यूट्रिनो नावाचे काही कण हे प्रकाशाच्या वेगाहूनही जास्त वेगाने पुढे सरकत असतात, असा दावा एका नवीन संशोधनातून शास्त्रज्ञांनी केल्यानं महान शास्त्रज्ञ अल्बर्ट आइनस्टाइनची ‘थेअरी ऑफ रिलेटिव्हिटी’ मोडीत निघण्याची शक्यता आहे.
अल्बर्ट आइनस्टाइनच्या सापेक्षतेच्या सिद्धांतानुसार कुठल्याही पदार्थापेक्षा प्रकाशाचा वेग हा सर्वाधिक आहे. मात्र, युरोपियन अणुसंशोधन केंद्र आणि इटालियन प्रयोगशाळेच्या संयुक्तपणे चाललेल्या प्रयोगातून असं निष्पन्न झालं आहे की न्यूट्रिनोचा वेग ताशी तीन लाख सहा किमी इतका आहे. हा वेग प्रकाशाच्या वेगापेक्षा ताशी सहा किमी जास्त आहे.
खरंतर या प्रयोगामागचा हेतू फक्त न्यूट्रिनोचे गतिमापन करणं इतकाच होता. मात्र, त्यातून समोर आलेला निष्कर्ष थक्क करणारा आहे. हा प्रयोग करताना कुणालाही अंदाज नव्हता की समोर येणारा परिणाम हा कल्पनेच्याही पलिकडचा असेल. या निष्कर्षाला दुजोरा देण्यासाठी शास्त्रज्ञांनी सहा महिन्यांचा कालावधी घेतला आणि नंतरच हे घोषित केलं, असं या प्रयोगात सहभागी असणारे शास्त्रज्ञ अन्तोनिओ इरेडितातो यांनी सांगितले.
या संशोधनामुळे अनेक प्रश्न उभे राहिले आहेत. न्यूट्रिनो इतके सुक्ष्म असतात की त्यांना वस्तुमान असल्याचे आत्ताच निदर्शनास आलं आहे. याचे निष्कर्ष क्रांतीकारी असून यामुळे अनेक जुन्या संकल्पनांची दुरुस्ती करावी लागेल, असं फ्रेंच वैज्ञानिक पियरी बिनेट्रॉय यांचं म्हणणं आहे. तर, याच प्रयोगात सहभागी असणारे दुसरे शास्त्रज्ञ अलफॉन्स वेबर यांच्या मते, या प्रयोगात काही चूक असण्याची शक्यता नाकारता येत नाही. यासाठी अधिक सावध असावं लागणार आहे.
First Published: Monday, September 26, 2011, 15:44