Last Updated: Sunday, March 31, 2013, 22:33
www.24taas.com, कणकवलीआगामी विधानसभा निवडणुकांची रंगीत तालिम म्हणून चर्चेत असलेल्या कणकवली आणि गुहागर नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी शांततेत मतदान पार पडलं. दोन्ही ठिकाणी सुमारे 70 टक्के मतदान झालं.
कणकवलीमध्ये नारायण राणे यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. राणेंना शह देण्यासाठी शिवसेना-भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस अशी महाआघाडी झाली...तर मनसेनं स्वतंत्रपणे निवडणूक लढवली.. तर गुहागरच्या नगरपंचायतीच्या पहिल्या निवडणुकीसाठी एकूण 17 जागांसाठी 42 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत... पालकमंत्री भास्कर जाधव यांचा हा मतदार संघ असून खरा सामना राष्ट्रवादी विरुद्ध शिवसेना-भाजप युतीमध्ये आहे. काँग्रेसनं आघाडी न करता एकला चलो रे ची भूमिका घेतल्यानं राष्ट्रवादी काँग्रेसला चांगलेच परिश्रम घ्यावे लागले.
स्वतः पालकमंत्री भास्कर जाधव गेल्य़ा अनेक दिवसांपासून गुहागर नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी शहरात ठाण मांडून बसले होते. त्यामुळं ही निवडणूक पालकमंत्री भास्कर जाधव आणि भाजपचे माजी आमदार विनय नातू यांच्यासाठी प्रतिष्ठेची मानली जातेय. भास्कर जाधवांविरोधात युतीनं कंबर कसलीय. उद्या मतमोजणी होणार असून निकालाकडं सा-याचं लक्ष लागलंय. दरम्यान दोन्ही बाजूंकडून विजयाचा दावा करण्यात येतोय.
First Published: Sunday, March 31, 2013, 22:33