Last Updated: Wednesday, September 25, 2013, 09:53
www.24taas.com, झी मीडिया, ठाणेकल्याण-डोंबिवली महापालिकेत सत्ताधारी शिवसेना नगसेवकांमध्ये फ्रिस्टाईल झाली. महासभेच्या सभागृहातच हाणामारी झाल्याने संताप व्यक्त होत आहे. या हाणामारीच्यावेळी सभागृहात तणाव पाहायला मिळाला. दरम्यान, शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मल्लेश शेट्टी आणि रवींद्र पाटील यांचे राजीनामे घेतले. त्यानंतर या दोघांनी जनतेची माफी मागितली.
कल्याण पूर्वेतील पाणीटंचाईवर चर्चा सुरू असतानाच महासभेच्या सभागृहातच सत्ताधारी नगरसेवकांनी लाखोली वाहण्यास सुरूवात केली. त्यानंतर बाचाबाची होवून हाणामारी करीत राडा झाला. केडीएमसी पालिकेतील महासभेत घडलेल्या घटनेनंतर उद्धव ठाकरे यांनी सर्व ३२ नगरसेवकांना शिवसेना भवन येथे येण्याचे आदेश दिले. त्यानंतर उपस्थित सर्व नगरसेवकांना या घटनेचा जाब विचारला. यावेळी तुम्हाला जनतेने निवडून सभागृहात पाठविले आहे. त्या जनतेची आधी माफी मागा, असे खडे बोल सुनावले. त्यानंतर नगरसेवकांनी जाहीर माफीनामा सादर केला. शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामना या दैनिकात याबाबतचे वृत्त प्रसिद्ध करण्यात आले आहे.
पक्षशिस्तीचा बडगा म्हणून दोघांचे राजीनामे घेण्यात आले आहेत. या दोघांना पुन्हा असे घडणार नाही, असे आश्वासन उद्धव यांना दिले आहे. मल्लेश शेट्टी आणि रवींद्र पाटील यांनी आपल्या पदाचे महापौरांकडे राजीनामे सादर केले आहे. आपल्या माफीनाम्यात त्यांनी म्हटले आहे की, हाणामारीचा प्रकार शिवसेनेच्या शिस्तीस व परंपरेस हा प्रकार शोभणारा नव्हता. आमच्या बेशिस्त वर्तनामुळे कल्याण-डोंबिवलीकर जनतेचा अपमान झाला. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना क्लेश झाला. जे सभागृहात वर्तन झाले त्याला आम्ही जबाबदार आणि दोषी आहोत. सुज्ञ नागरिकांना आम्हाला माफ करावे.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.पाहा व्हिडिओहाणामारी व्हिडिओ
First Published: Wednesday, September 25, 2013, 09:41