Last Updated: Wednesday, October 24, 2012, 11:25
www.24taas.com, नवी मुंबईराष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी नवी मुंबई महापालिकेच्या अभियंत्याला धमकी दिल्याचे समजते. या अनधिकृत इमारतीचे दोन मजले पाडण्याचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिला आहे. पाम टॉवरमध्ये जवळपास दीड हजार मीटर अनधिकृत बांधकाम झाले आहे.
याप्रकरणी एक जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल झाल्यानंतर सदर इमारतीचे वरील दोन माळे पाडण्याचा आदेश न्यायमूर्तींनी पालिका प्रशासनाला दिला. या बांधकामाचे वास्तुविशारद शेषनाथ ऍण्ड असोसिएट असून तेच या अनधिकृत बांधकामाला जबाबदार आहेत. उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार नवी मुंबई महापालिका प्रशासनाने या टॉवरवर कारवाईची तयारी सुरू केली आहे. मात्र या कारवाईची कुणकुण लागल्यानंतर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी पालिकेचे अभियंता अवधूत मोरे यांना फोन वरून धमकी दिल्याचे समजते.
या इमारतीत माझ्या नातेवाईकांचे दोन फ्लॅट आहेत. त्यामुळे मी पालिकेच्या हलचालीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे. जर या इमारतीवर कारवाई झाली तर परिणाम वाईट होतील, असे आव्हाड यांनी मोरे यांना धमकावल्याचे मोरे यांनी सांगितले आहे. अवधूत मोरे हे माजी सभागृहनेते व विद्यमान नगरसेवक विठ्ठल मोरे यांचे चिरंजीव आहेत. याप्रकरणी सीबीडी पोलीसांनी तक्रार दाखल करून घेतली असून ते पुढील तपास करीत आहेत. दरम्यान, या प्रकारामुळे महापालिकेतील अधिकारीवर्गात जोरदार खळबळ उडाली आहे.
First Published: Wednesday, October 24, 2012, 11:20