Last Updated: Thursday, August 22, 2013, 18:39
www.24taas.com, झी मीडिया, ठाणेडॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या हत्येनंतर गळा काढणा-या राजकारण्यांनी दोनच दिवसात आपले रंग दाखवायला सुरूवात केली. महाराष्ट्राच्या पुरोगामित्वाचा जप करत, या राजकीय नेत्यांनी हिंदुत्ववादी धर्मांध शक्तींच्या नावाने खडे फोडले. आता दहीहंडीच्या निमित्ताने संस्कृती जपण्याच्या नावाखाली तेच नेते उत्सवाच्या सेलिब्रेशनमध्ये `बिझी` झालेत...
डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या हत्येनंतर अख्खा महाराष्ट्र हळहळला. महाराष्ट्राच्या पुरोगामित्वाचीच हत्या झाल्याची भावना व्यक्त करण्यात आली. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष जितेंद्र आव्हाड हे देखील या हत्येने गलबलून गेले होते. धर्मांध हिंदुत्ववादी शक्तींनीच दाभोलकरांची कशी हत्या केली, याचे दाखले ते ओरडून ओरडून सांगत होते.
पण आता ते सावरलेत... दाभोलकरांच्या हत्येचं दुःख त्यांनी जड अंतःकरणानं बाजूला ठेवलंय.. आपल्या काळजावर दगड ठेवून ते यंदाच्या दहीहंडी उत्सवाचे आयोजन करणार आहेत. पुरोगामित्वाची झूल उतरवून ठेवून पारंपारिक साज चढवताना आव्हाडांना किती `संघर्ष` करावा लागत असेल, ते जावे त्यांच्या वंशा तेव्हाच कळेल... फिल्मी नट-नट्यांच्या उपस्थितीत ठाण्याच्या पाचपाखाडीत दहीहंडीचा थरार ते यंदाही एन्जॉय करतील, पण या हस-या चेह-यामागचे दुःख कुणाला समजू शकणार नाही...
आता पुन्हा एकदा `ढाक्कुमाक्कुम... ढाक्कुम्माकुम्म.` चा गजर सुरू झालाय. डीजेच्या तालावर `चिकनी चमेली` कंबर मटकवायला सज्ज झालीय. दरवर्षीची जीवघेणी स्पर्धा अनाऊन्स झालीय. उंचच उंच हंड्या फोडण्यासाठी लाखो रूपयांच्या बक्षिसांची आमीषं दाखवली जातायत... आव्हाडांप्रमाणे ही `संस्कृती` जपण्याची जबाबदारी शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनीही खांद्यावर घेतलीय... सरनाईक यांच्या उत्सवात जोगेश्वरीच्या जय जवान गोविंदा पथकाने गेल्यावर्षी स्पेनचा जागतिक रेकॉर्ड तोडताना ४३.७९ फुट उंचीचे नऊ थर लावले होते. त्यामुळे या मंडळाची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झालीय.
हंड्यांचे थर वाढतायत, बक्षिसांच्या रकमा वाढतायत, पण जखमी गोविंदांकडे बघायला कुणाला वेळ नाही. राजकारण्यांच्या कृपेने या सणांचे इवेन्ट बनलेत. स्वतःची राजकीय प्रतिमा घडवण्यासाठी इवेन्ट मॅनेजमेंट कंपन्या आणि प्रायोजकांना हाताशी धरून राजकारणी प्रसिद्धीची हंडी फोडतायत. प्रसिद्धीची अफलातून झिंग चढलेले असे भारंभार श्रीकृष्ण गल्लीबोळात तयार झालेत, पण कृष्ण आणि कंस यांतला फरक कसा ओळखायचा, हा खरा प्रश्न आहे.
*
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.*
झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.
First Published: Thursday, August 22, 2013, 18:39