कोकण रेल्वे मार्गाचे दुपदरीकरण - तायल, Konkan Railway double line route - Tayal

कोकण रेल्वे मार्गाचे दुपदरीकरण - तायल

कोकण रेल्वे मार्गाचे दुपदरीकरण - तायल
www.24taas.com, झी मीडिया, नवी मुंबई

कोकण रेल्वे मार्गावर सातत्याने प्रवाशांची गर्दी होत आहे. त्यामुळे प्रवाशांच्या सोयीसाठी जादा गाड्या सोडण्यात येत आहे. मात्र, रेल्वेचा एकेरी मार्ग असल्याने गाड्यांना विलंब होत आहे. त्यामुळे प्रवासाची वेळ लांबत आहे. यावर मार्ग काढण्यासाठी कोकण रेल्वेने प्रयत्न सुरू केले आहेत. कोरेचा दुपदरीकरणाचा प्रस्ताव आहे. त्यासाठी सर्वेक्षण करण्याचे काम सुरू आहे. रेल्वे मंत्र्यालयाने कोकण रेल्वेमार्गाच्या दुपदरीकरणाला परवानगी दिली तर चार वर्षात मार्ग पूर्ण करण्यात येईल, अशी माहिती कोकण रेल्वेचे व्यवस्थापकीय संचालक भानू तायल यांनी पत्रकार परिषदेत दिली.

कोकण रेल्वे कोकणातून धावत असली तरी तिचा लाभ कोकणवासीयांना फारसा होत नाही. अनेकवेळा वेटिंगचा प्रवास करावा लागत आहे. दिवा-सावंतवाडी ही गाडी आता मडगावपर्यंत नेण्यात आली आहे. केवळ रत्नागिरी-दादर-रत्नागिरी आणि राज्यराणी, दादर-सावंतवाडी या दोनच गाड्या कोकणवासीयांच्या वाट्याला आल्या आहेत. मात्र, वाढती गर्दी लक्षात घेता या गाड्या अपुऱ्या पडत आहेत. नव्या गाड्या सोडण्याबाबत कोकण रेल्वेने प्रयत्न केल्याचे दिसत नाही. नव्या गाड्यांबाबत तायल यांनी कोणतेही भाष्य पत्रकार परिषदेत केले नाही.

मात्र, या मार्गावर वाहतुकीची आणखी वाढ करण्याच्या उद्देशाने दुहेरीकरण आणि विद्युतीकरण करण्यासाठी सर्वे सुरू आहे, असे तायल यांनी सांगितले. दुपदरीकरण मार्गासाठी १५ हाजर कोटी रूपयांचा खर्च अपेक्षित आहे. यासाठी जागतिक बॅंकेने या कर्जाची तयारी दाखविली असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, कोकण रेल्वेचे टर्मिनस सावंतवाडी की मडुरे या वादाला पूर्णविराम मिळाला आहे. कोकण रेल्वेचे टर्मिनस नियोजित आराखड्यानुसार सावंतवाडीत होणार आहे. मध्यंतरी मडुरे येथे कोकण रेल्वेचे टर्मिनस हलविण्याची मागणी करण्यात येत होती. मात्र, तसा कोणताही विचार नाही, असे भानू तायल यांनी सांगितले. दरम्यान, कोरेचे टर्मिनस मडुरे येथे हलविण्यासाठी उद्योग मंत्री नारायण राणे यांची आग्रही मागणी होती.

कोकण रेल्वेची स्थापना झाल्यापासून कोकण रेल्वेने विविध क्षेत्रात प्रगती केली आहे. तसेच ही लाईन सुरू झाल्यापासून २०१२-१३ या वर्षात वाहतुकीतून ७२८ कोटी रूपये महसूल मिळवला आहे. गतवर्षीचे उत्पन्न ६७२ कोटी इतके होते. चालू वर्षात ते ४१ टक्क्यांनी वाढले आहे. तर मूळ लोडींग वाढविल्याने कोकण रेल्वेला नफ्यात यायला मदत मिळणार आहे, ते म्हणालेत.

कोकण रेल्वे मार्गावर एका महिन्यात १२०० प्रवासी गाड्या व वर्षात ५०० विशेष गाड्या चालविल्या जातात. रेल्वेने आपल्या बांधकाम कौशल्याचा वापर करून मुंबई-पुणे हायवेवरील आंतरराष्ट्रीय स्तराचे बोगदे, झारखण्ड येथे रॉब, आंध्र प्रदेशात ओक बोगदा बांधला आहे. त्याचप्रमाणे रेल्वेने गाडयांची धडक टाळण्यासाठी रोधी तंत्रज्ञान विकसित केले आहे. रोल ऑन रोल ऑफ सेवेलाही चांगला प्रतिसाद मिळत असल्याचेही तायल यावेळी सांगितले.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.

First Published: Wednesday, October 9, 2013, 09:30


comments powered by Disqus