महायुती नेत्यांचा काँग्रेस आघाडी सरकारवर घणाघात, Mahayuti comment on the Congress lead Government

महायुती नेत्यांचा काँग्रेस आघाडी सरकारवर घणाघात

महायुती नेत्यांचा काँग्रेस आघाडी सरकारवर घणाघात
www.24taas.com, झी मीडिया, डोंबिवली

काँग्रेसच्या सरकारने वाट लावली आहे. आमचं हिंदुत्व हे राष्ट्रीयत्व आहे. पण आघाडी सरकार सध्या हिंदू धर्मीयांवर अन्याय करत आहे, असा आरोप शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला. तर काँग्रेसने देशाचा विश्वासघात केला आहे, अशी टीका करत आमचे नेते नरेंद्र मोदीच पंतप्रधान होतील, असा विश्वास भाजपचे नेते गोपीनाथ मुंडे यांनी केला. तसेच बाळासाहेब ठाकरेंच्या पाठीत खंजीर खुपसणाऱ्यांना धडा शिकवा, असे आवाहन आरपीआयचे नेते रामदास आठवले यांनी केले.

डोंबिवलीत आज महायुतीची जाहीर सभा झाली. यावेळी महायुतीचे सर्व नेते उपस्थित होते. यावेळी जोरदार टीका करण्यात आली. विनोद तावडे यांनी काँग्रेस सरकारचे वाभाडे काढले. मात्र, पाचवा भिडू खासदार राजू शेट्टी उपस्थित नव्हते.

मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे सर्वात मोठे भोंदू बाबा आहेत. आघाडीनं दहा वर्षांत देशावर, राज्यावर वरवंटा फिरवला, असा घणाघात उद्धव यांनी करत शरद पवार आमचीही स्मरणशक्ती तीव्र आहे. तुम्ही दिल्लीत केलेल्या शिखाचं हत्याकांड आम्ही विसरलेलो नाही. तसंच शरद पवार मुख्यमंत्री असताना नागपुरात गोवारींचं हत्याकांड झालं, हे लक्षात ठेवा असा सल्ला उद्धव यांनी दिला.

अन्नसुरक्षेचा फायदा किती लोकांना मिळत आहे, असा सवाल उपस्थि केला. अन्नसुरक्षेच्या माध्यमातून दिलं जाणारं धान्य निकृष्ट दर्जाचं आहे. राहुल गांधी म्हणतात तोडो नही जोडो. आम्ही म्हणतो राहुल गांधींना आणि आघाडीला जोडेच मारले पाहिजे. यावेळी डोंबिवलीत सरकारच्या धोरणामुळे प्रदूषण होत आहे. त्याचाच प्रत्यय हिरव्या पावसाच्या रुपाने पाहायला मिळाला, असे उद्धव म्हणालेत.

गोपीनाथ मुंडेचा हल्लाबोल

काँग्रेसने देशाचा विश्वासघात केला आहे. मंत्रालयाला आग कोणी लावली. आमचं सरकार आलं तर याची चौकशी करून दोषींना तरुंगात धाडू, अस इशारा गोपीनाथ मुंडे यांनी दिला.

मुंबई-पुणे रस्ता हा शिवसेना प्रमुखांचं स्वप्न महायुतीने पूर्ण केलं आहे. नरेंद्र मोदींच्या पाठीशा शिवरायांचा महाराष्ट्र उभा राहिलं. तेच पंतप्रधान पदाची शपथ घेतील असे सांगताना आनंद परांजपे, तुमची नगरसेवक व्हायची लायकी नव्हती, तुम्हाला बाळासाहेबांनी खासदार केलं. त्यांनाच तुम्ही फसवलंत. मात्र, आताच सांगतो या आठवड्यात राष्ट्रवादीचे दोन नेते महायुतीत आणणार, असा दावा मुंडे यांनी यावेळी केला.

राज्य सरकारमधील एकूण १६ मंत्री भ्रष्टाचारी आहेत. सिंचन घोटाळ्यापेक्षा अजित पवारांच्या ऊर्जा विभागात मोठा घोटाळा झाला आहे. महाराष्ट्रात वीजेची चोरी सर्वाधिक होते. त्याकडे यांचे लक्ष नाही. मात्र, महायुतीचं सरकार आल्यानंतर महाराष्ट्र टोलमुक्त करणार, एलबीटी रद्द करणार, असे आश्वासन मुंडे यांनी दिले.

रामदास आठवलेंची टोलेबाजी

आमचं राज्य येणार आहे. त्यामुळे ज्या काही गोष्टी पूर्ण व्हायच्या आहेत त्या आम्ही पूर्ण करू. शिवाजी महाराजांचं भव्य स्मारकही महायुतीच बनवणार आहे. इंदूमिलच्या जागेवर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक उभे राहिल, हे महायुतीचे सरकार करील. यांना समुद्रातील जागा सापडत नाही. ती आम्हीच शोधणार त्यांना समुद्राच्या पाण्यात ढकलून देऊ, असा शालजोडा रामदास आठवले यांनी काँग्रेस आघाडीला हाणला.

काँग्रेस-राष्ट्रवादी दहापट जातीयवादी आहेत. ठाण्याचं विभाजन अद्याप का झालेले नाही, असा सवाल उपस्थित करून बाळासाहेब ठाकरेंच्या पाठीत खंजीर खुपसणाऱ्यांना धडा शिकवला पाहिजे. आनंद परांजपे इकडे राहिले असते, तर आनंदात असते, आता ते तिकडे पडणार आहेत, त्यामुळे ते दु:खातच अडकणार आहेत. एकनाथ शिंदेंसारखा चांगला बॉलर, आदित्य ठाकरेंसारखा एक चांगला बॅट्समन महायुतीत आहे. त्यामुळे येत्या निवडणुकीत महायुतीचा स्कोर मोठा होणार आहे, असे आठवले म्हणालेत.
















इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Sunday, February 23, 2014, 23:02


comments powered by Disqus