शिवसेनेच्या नगरसेवकाने रोखले पिस्तुल, Mauser gun on security guard in Navi Mumbai

शिवसेनेच्या नगरसेवकाने रोखले पिस्तुल

शिवसेनेच्या नगरसेवकाने रोखले पिस्तुल
www.24taas.com,नवी मुंबई

नवी मुंबईतील एपीएमसी फळमार्केटमधील सुरक्षा रक्षकावर शिवसेनेच्या एका नगरसेवकाने पिस्तुल रोखले. कर पावती फाडली नसल्याकारणाने नगरसेवकाची सुरक्षा रक्षकाने गाडी अडविली. त्यामुळे नगरसेवकाने पिस्तुलचा धाक दाखविण्याचा प्रयत्न केला.

सुरक्षा रक्षकावर पिस्तुल रोखल्या प्रकरणी कर्जत नगरपालिकेचे शिवसेनेचे नगरसेवक नितीन नंदकुमार सावंत यांच्यासह दोन कार्यकर्त्यांना एपीएमसी पोलिसांनी अटक केली. या प्रकरणातील पिस्तूल आणि कार जप्त करण्यात आली आहे.

एपीएमसीतील फळमार्केटमध्ये १९ एप्रिल रोजी नितीन सावंत हे संतोष शिवाजी देशमुख (३९, रा. कर्जत) आणि दिनेश दत्ता गायकवाड (३३, रा. कर्जत) यांच्यासह आंबा खरेदी करण्यासाठी आले होते. तीन पेट्या आंबा खरेदी केले. यानंतर गेट नंबर चारमधून कार (एमएच ४६ पी ७७७६) बाहेर पडताना सुरक्षा रक्षक माधव पहारेने सेस भरल्याची पावती त्यांच्याकडे मागितली. मात्र सावंत यांनी पावती नसल्याचे सांगितले. नियमानुसार कर भरल्यावरच माल घेऊन जाता येईल असे पहारे याने सांगितल्याने सावंत आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी त्याच्याशी वाद घालण्यास सुरुवात केली.

नियमानुसार कर भरावाच लागेल असे सुरक्षा रक्षकाने सांगितल्याने सावंत यांनी त्याच्यावर पिस्तूल रोखले होते. या प्रकरणी एपीएमसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. गुन्हय़ात वापरण्यात आलेले पिस्तूल आणि कार जप्त करण्यात आली आहे, अशी माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक डी. एन. कोंडे यांनी दिली. दरम्यान, त्यांना न्यायालयात हजर केले असता, त्यांची जामिनावर सुटका करण्यात आली आहे.

First Published: Tuesday, April 23, 2013, 15:05


comments powered by Disqus