गणेश नाईक यांना हायकोर्टाचा दणका, Mumbai High Court, Ganesh Naik, Glass House,

गणेश नाईक यांना हायकोर्टाचा दणका

गणेश नाईक यांना हायकोर्टाचा दणका
www.24taas.com,झी मीडिया,मुंबई

ठाण्याचे पालकमंत्री गणेश नाईक यांना मुंबई हायकोर्टानं दणका दिलाय. बेलापूर एमआयडीसीमधले ग्लास हाऊस पाडून बावळेश्वर मंदिराची जागा ताब्यात घेण्याचे आदेश हायकोर्टानं दिले आहेत.

संदीप ठाकूर यांनी या संदर्भात हायकोर्टात याचिका केली होती. त्यावर कोर्टानं निर्णय दिलाय. कोर्टानं एमआयडीसीला हे ग्लास हाऊस पुढील दोन आठवड्य़ात पाडण्याचे आदेश दिले आहेत. आदेशाची अंमलबजावणी न झाल्यास नवी मुंबई महापालिकेनं हे ग्लास हाऊस पाडावे असंही आदेशात नमूद करण्यात आलंय. विशेष म्हणजे गणेश नाईक यांच्या मालकीचं हे ग्लास हाऊस नाही तर मग ऑक्टोबर आणि डिसेंबर २०११मध्ये नाईक ७२ वेळा या ग्लास हाऊसमध्ये कशासाठी गेले होते असा सवालही हायकोर्टानं उपस्थित केलाय.

या अनधिकृत बंगल्याचे बांधकाम होत असताना कारवाई करण्याऐवजी पालिका अधिकाऱ्यांनी केवळ बघ्याची भूमिका घेतली. हे बांधकाम केवळ या अधिकाऱ्यांच्या आशीर्वादामुळेच उभे राहू शकले आहे. हे बांधकाम म्हणजे महापालिकेच्या नाकर्तेपणाचे उत्तम उदाहरण आहे. मंत्री असो वा त्याचे नातलग, कायदा सर्वांसाठी समान असतो, असे न्यायालयाने बजावले.

न्या. डॉ. धनंजय चंद्रचूड व न्या. एस.सी. गुप्ते यांच्या खंडपीठाने हे ग्लास हाऊस पाडण्याचे आदेश दिलेत. सध्या `ग्लास हाऊस`चा ताबा ज्यांच्याकडे आहे त्या संतोष तांडेल यांनी येत्या दोन आठवड्यांत स्वत:हून ते तोडावे अन्यथा त्यानंतर नवी मुंबई पालिकेने ही कारवाई करून त्याचा पूर्तता अहवाल ८ ऑगस्टला न्यायालयात सादर करावा. पुढील सुनावणी २३ ऑगस्टला ठेवली गेली.

३०१ चौ.मी. भूखंडावर बांधण्यात आलेला हा बंगला बेकायदा असून, तो पाडण्याचे आदेश न्यायालयाने द्यावेत, अशी मागणी करणारी जनहित याचिका नवी मुंबई येथील संदीप ठाकूर यांनी केली आहे. त्यावरील सुनावणीत या बांधकामाला कोणतीही परवानगी दिली नसल्याचे सिडको व पालिकेने प्रतिज्ञापत्राद्वारे स्पष्ट केले. तर या बंगल्याचा आपण काही वेळा कार्यालय म्हणून वापर केला असल्याचा दावा गणेश नाईक यांच्यावतीने करण्यात आला. त्यावर या बंगल्याला गेल्या दोन वर्षांत ७२ वेळा पोलीस संरक्षण दिल्याची माहिती याचिकाकर्ते ठाकूर यांनी न्यायालयाला दिली.

# इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

# झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Saturday, July 6, 2013, 09:37


comments powered by Disqus