लोकसभा अध्यक्षपदी सुमित्रा महाजन, Sumitra Mahajan, president of the Lok Sabha, celebration in Konkan

लोकसभा अध्यक्षपदी सुमित्रा महाजन, कोकणात आनंदोत्सव

लोकसभा अध्यक्षपदी सुमित्रा महाजन, कोकणात आनंदोत्सव
www.24taas.com, झी मीडिया,रत्नागिरी

लोकसभेच्या अध्यक्षपदी भाजपच्या ज्येष्ठ खासदार सुमित्रा महाजन यांचं नाव निश्चित झालंय. त्यांच्या निवडीनं कोकणातील रत्नागिरीमधील चिपळूणमध्ये आनंदोत्सव साजरा होत आहे. कारण एका चिपळूणकर कन्येला लोकसभा अध्यक्षपदी बसण्याचा बहुमान प्रथमच प्राप्त होणार आहे. चिपळुणात लहानाची मोठी झालेली ही मराठी मुलगी लोकशाहीतील या मानही चिपळूणची सर्वोच्च मुलगी मोठ्या स्थानावर विराजमान होत आहे.

इंदोरमधून तब्बल आठ वेळा लोकसभेवर निवडून गेलेल्या सुमित्रा महाजन मुळच्या कोकणातील चिपळूणच्या. चिपळूणच्या अप्पासाहेब साठे यांच्या कुटुंबावर संघाची मोठी छाप. साठ वर्षापूर्वीच्या चिपळूणातील बापट आळी ते चिंचनाकाच्या दरम्यान या साठे कुटुंबाच निवासस्थान होत. सुमित्राच पहिलीपासूनच शिक्षण चिपळूणच्या बापट आळीतील कन्या शाळेत झाले. साठेंच्या घरी तेव्हा संघाच्या अनेक नेत्यांची ये जा असे..त्याची आठवण चिपळूणात काढली जाते.

पुढे युनायटेड इंग्लिश स्कूलमध्ये सुमित्रा महाजन यांचे आठवी ते जुन्या अकरावीपर्यंतच शिक्षण झालं. आज जेव्हा सुमित्रा महाजन लोकसभेच्या अध्यक्ष झाल्यात सर्वाधिक आनंद झाला, तो सुमित्रा महाजन यांच्या वर्ग मैत्रीण नेने यांना. नेने यांची सुमित्रा महाजन यांच्या बरोबर शालेय जीवनात सुरु झालेलली मैत्री आज ही अगदी तशीच कायम आहे. आपली मैत्रीण आज महाराष्ट्राचा सन्मान बनतेय या जाणीवेने त्यांना आपण या कर्तुत्ववान महिलेची मैत्रीण असल्याचा अभिमान वाटतोय, असे सरोज नेने सांगतात.

आजही सुमित्रा महाजन चिपळुणात आल्या की आपल्या मैत्रिणीला आवर्जुन भेटतात. त्यांच्या विषयी बोलताना नेने महाजना विषयी भरभरून बोलतात. सुमित्रा महाजन बालपणापासूनच हुशार आणि नेतृत्व संपन्न होत्या. आज ही चिपळूणच्या लोकमान्य टिळक स्मारकाच्या वाचानालायाशी सुमित्रा महाजन आणि त्यांच्या बंधूचा निकटचा संबंध आहे. सुमित्रा महाजन जेव्हा चिपळुणात येतात तेव्हा दीडशे वर्षे जुन्या या वाचनालयाला आवर्जुन भेट देतात. ज्या खिडकीत त्या वाचन करायच्या त्याचे किस्से इथे जमणा-यांना सांगतात.

सुमित्रा महाजन यांचे वडील आप्पासाहेब साठे यांच्या नावे इथं मोठा सभागृह बांधण्यात आलाय. इथं उब्या राहत असलेल्या इमारतींना हि सुमित्रा महाजन यांच्या माध्यमातून निधी येतोय. सुमित्रा महाजन या कोकण कन्येच्या रूपाने लोकसभेच्या अध्यक्षपदी विराजमान होण्याचा मान प्रथमच एका महाराष्ट्रीयन महिलेला मिळतोय या सन्मानाने प्रत्येक कोकणवासी सुखावलाय.



* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Thursday, June 5, 2014, 19:50


comments powered by Disqus