Last Updated: Thursday, December 13, 2012, 08:47
www.24taas.com, उल्हासनगर उल्हासनगरमध्ये एका शिक्षकानं विद्यार्थिनीच्या अशी कानाखाली मारली की तिला ऐकायला येणंच कमी झालंय, अशी तक्रार पालकांनी दाखल केलीय.
उल्हासनगरमधील द्वारली गावातील अभ्युदय विद्यालयात सहावीत शिकणारी मोनिका राणे ही शुद्धलेखनासंदर्भात काही तरी विचारण्यासाठी शिक्षक हेमंत बावीस्कर यांच्याकडे गेली होती. त्यावेळी शिक्षक हेमंत बावीस्कर यांनी तिच्या कानाखाली इतक्या जोरात मारलं की तिच्या कानाला सूज आली आणि ऐकायलाही कमी यायल लागलं. घडलेला प्रकार तिनं तिच्या पालकांना सांगितला. त्यानंतर तिला तिच्या पालकांनी सरकारी हॉस्पिटलमध्ये दाखल केलंय.
मोनिकाची आई कोमल राणे यांनी केलेल्या तक्रारीनुसार हिललाईन पोलिसांनी बाविस्कर यांच्याविरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल केला. तर, बाविस्कर यांना निलंबित करण्यात यावे, अशी मागणी मोनिकाचे वडील मुरलीधर राणे यांनी केली आहे.
बावीस्कर यांना निलंबित करण्यात यावं, अशी मागणी मोनिकाच्या पालकांनी केलीय. तर असा कुठलाच प्रकार घडला नाही, असं शाळेचे मुख्याध्यापक जगन्नाथ नेमाडे यांनी म्हटलंय. प्रशासनाचं म्हणणंय. त्यामुळे वैद्यकीय अहवाल आल्यानंतरच पुढील कारवाई केली जाईल, असं पोलिसांनी सांगितलंय.
First Published: Thursday, December 13, 2012, 08:43