पाणी भरताना मुलगी पडली विहिरीत - Marathi News 24taas.com

पाणी भरताना मुलगी पडली विहिरीत

www.24taas.com, ठाणे
ठाणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातलं पाणीटंचाईचं भीषण वास्तव पुन्हा एकदा समोर आलंय. मोखाडा तालुक्यात टँकरच्या पाण्यासाठी झुंबड उडालेली असताना एक मुलगी तोल जाऊन विहिरीत पडली आणि गंभीर जखमी झालीय.
 
या मुलीचं नाव रोशना शिंदे  असं आहे. सुदैवानं या मुलीचा जीव वाचला, पण तिच्या डोक्याला गंभीर दुखापत झालीय. ठाण्यातल्या हॉस्पिटलमध्ये तिच्यावर उपचार सुरु आहेत. किनिस्ते गावात ही दुर्घटना घडली. यापूर्वी डोलारे गावात सुनंदा पवार या महिलेचा असाच पाणी भरताना विहिरीत पडून दुर्दैवी मृत्यू झाला होता. याच मोखाडा तालुक्यात ही आणखी एक दुर्घटना घडलीय.
 
या दुर्घटनेत सुदैवानं मुलीचा जीव वाचला असला तरी ठाणे जिल्ह्यात गावागावांत असे शेकडो नागरिक हंडाभर पाण्यासाठी आपला जीव धोक्यात घालतात. एक-दोन दिवसानं गावात टॅंकर आला की पाणी भरण्यासाठी झुंबड उडते. विहिरीत टँकर रिता केला जात असताना पाणी भरण्यासाठी उसळणाऱ्या गर्दीत तोल जाऊन कोण कधी विहिरीत पडेल, याचा नेम नसतो. घोटभर पाण्यासाठी नागरिकांचे हाल सुरु असून पाण्यासाठी जीवावर उदार होऊन लोक टँकर आला की गर्दी करतात.
 

First Published: Sunday, May 20, 2012, 17:35


comments powered by Disqus