सीकेपी बँकेचे संचालक मंडळ बरखास्त - Marathi News 24taas.com

सीकेपी बँकेचे संचालक मंडळ बरखास्त

www.24taas.com,ठाणे
 
सीकेपी बँकेचे संचालक मंडळ बरखास्त करण्यात आले असून बँकेवर प्रशासक नेमण्यात आला आहे. बँकेत गैरव्यवहार झाल्यानं संचालक मंडळ बरखास्त करण्यात आले. या वृत्तानंतर ठेवीदारांमध्ये घबराट उडालीय.
 
वृत्ताची खातरजमा करुन घेण्यासाठी ठेवीदारांनी ठाण्यातल्या सीकेपी बँकेत धाव घेतली. 1915 साली स्थापन करण्यात आलेल्या सीकेपी बँकेच्या मुंबई, ठाणे, आणि डोंबिवलीत आठ शाखा आहेत. या शाखांमध्ये 4 लाख ठेवीदार असून 40 हजार शेअरहोल्डर आहेत.
 
दुसरीकडे रिझर्व्ह बँकेकडून अशी कोणतीही नोटीस मिळाली नसल्याचं सीकेपी बँक व्यवस्थापनानं सांगितलंय.. शिवाय नोटीशीबाबतची अफवा लोन डिफॉल्टरनी पसरवल्याची शंकाही बँक व्यवस्थापनानं व्यक्त केलीय. याबाबत आमचे प्रतिनिधी कपिल राऊत यांनी बँकेचे चेअरमन विलास गुप्ते यांच्याशी बातचीत केलीय.
 
सुमारे एक हजार कोटीहून अधिक ठेवी असलेल्या मुंबईतील प्रतिष्ठित सीकेपी को-ऑप. बँकेचे संचालक मंडळ बरखास्त करून प्रशासकाची नेमणूक करण्यात आली आहे. संचालक मंडळाने केलेल्या अनियमित कारभारामुळे ही कारवाई केल्याची माहिती सहकार आयुक्त मधुकर चौधरी यांनी  दिली.
 
या बँकेच्या संचालक मंडळाने परवानगीशिवाय जागा खरेदी करणे, एटीएम सुरू करणे यांसारख्या अनेक चुका केल्या आहेत. याबाबत सूचना देऊनही सुधारणा न झाल्याने सहकार खात्याने बँकेचे संचालक मंडळ बरखास्त केले.
 
संचालक मंडळ बरखास्ती म्हणजे बँकेला दिलेली शेवटची संधी असते. यानंतरही जर संचालक मंडळाने आपला कारभार सुधारला नाही, तर रिझर्व्ह बँक संबंधित बँकेला अवसायनात काढू शकते. पेण बँकेसह इतर बँकांकडून सीकेपीच्या संचालक मंडळाने बोध घ्यावा अन्यथा होणार्‍या परिणामांना सामोरे जावे, असा इशारा देण्यात आला आहे.
 
व्हिडिओ पाहा..
 

First Published: Friday, June 1, 2012, 10:54


comments powered by Disqus