सचिन तेंडुलकरच्या गावात जल्लोष - Marathi News 24taas.com

सचिन तेंडुलकरच्या गावात जल्लोष

 www.24taas.com, रत्नागिरी
 
क्रिकेटचा देव समजल्या जाणा-या सचिन तेंडुलकरनं खासदारकीची शपथ घेतल्याचे समजताच त्याच्या रत्नागिरी जिल्ह्यातील हर्चे गावात आनंदाचे वातावरण पसरले आहे. मात्र त्याचबरोबर खासदार झाल्यावर तरी सचिननं वेळ काढून गावात यावे आणि गावाच्या समस्यांचा आढावा घेऊन त्या सोडवाव्यात, अशी प्रामाणिक इच्छा गावकरी बाळगून आहेत.
 
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याने राज्यसभेच्या सदस्यत्वाची  शपथ घेऊन आपल्या नव्या इनिंगची सुरवात केली. खासदारकीची शपथ ग्रहण केल्यानंतर पहिल्याच प्रतिक्रियेत 39 वर्षीय सचिनने यापुढील काळातही आपले सर्वोच्च प्राधान्य क्रिकेटलाच असेल, असे स्पष्ट केले.
 
सचिन आणि त्याची पत्नी अंजली संसदेत पोचले. वृत्तवाहिन्यांचे प्रतिनिधी व कॅमेरामन यांच्या गराड्यातून त्यांना थेट राज्यसभा अध्यक्ष हमीद अन्सारी यांच्या दालनात नेण्यात आले. तेथे अन्सारी यांनी त्यांचे स्वागत केले. संसदीय कामकाजमंत्री हरीश रावत, पंतप्रधान कार्यालयाचे राज्यमंत्री नारायण सामी व राज्यमंत्री राजीव शक्‍ला आदी उपस्थित होते. सचिनने शपथग्रहण करताना मातृभाषा किंवा विश्‍वभाषेपेक्षा राष्ट्रभाषेलाच प्राधान्य दिले.
 
खासदार सचिन काय म्हणाले..
माझे प्राधान्य क्रिकेटलाच असेल. मी जो काही आहे तो क्रिकेटमुळेच आहे. क्रिकेटने मला खूप काही दिले. आता मी क्रिकेटला काही देण्याची वेळ आली आहे. क्रिकेटमधून निवृत्तीबाबतच्या बहुचर्चित प्रश्‍नावर सचिनने माहिती नाही, असे सांगितले.

First Published: Tuesday, June 5, 2012, 12:49


comments powered by Disqus