ठाण्यामध्ये 'पवार'फुल दौरा - Marathi News 24taas.com

ठाण्यामध्ये 'पवार'फुल दौरा


झी 24 तास वेब टीम, ठाणे 
 
विधानसभेत दोन डझन आमदारांची रसद पुरविणाऱ्या ठाणे जिल्ह्यात राष्ट्रवादीची पक्षसंघटना आणखी मजबूत करण्यासाठी तसेच पक्षांतर्गत गटबाजीला मूठमाती देऊन आगामी निवडणुकांच्या तयारीला लावण्यासाठी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार हे येत्या शुक्रवारी ठाणे शहरात दिवसभर कार्यर्कत्यांशी संवाद साधणार आहेत. ठाण्यातील भिवंडी बायपासवरील शांग्रीला रिसॉर्टमध्ये पवार ग्रामीण व शहरी भागातील कार्यकर्त्यांचे म्हणणे जाणून घेतील. शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे शनिवारी ठाण्यात आले, तेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांच्या दौऱ्यावर टीका केली होती. शहरात एकही होर्डिंग न लावता उद्धव यांनी लपत छपतच दौरा केला. ठाण्याच्या रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यात आपल्या आलिशान गाडीचा खुळखुळा होऊ नये, यासाठी स्कॉपिर्ओ गाडीतून आले अशा अनेक आरोपांच्या फैरी जीतेंद आव्हाड यांनी झाडल्या होत्या. या आरोपांची परतफेड शिवसेनेचे पदाधिकारी पवार यांच्या दौऱ्यादरम्यान करण्याची शक्यता आहे. त्यामुळे राजकीय वातावरणही ढवळून निघणार आहे.
 
उध्दव आणि पवार यांचा दौरा हा पालिका निवडणुकांच्या तयारीची नांदी ठरणार आहे. पालिका निवडणुका स्वबळावर लढवायच्या की काँग्रेसशी आघाडी करायची, याबाबत कार्यकतेर् आणि पदाधिकाऱ्यांचे मत पवार आजमावतील अशी शक्यता आहे. तसेच मंत्री, आमदार, खासदार आणि स्थानिक स्वराज्य संस्थांतील लोकप्रतिनिधी आणि सामान्य जनता यांच्यातील संवाद तुटत चालला असून, सामान्यांशी नाळ जोडण्याचा कानमंत्र देण्यासाठीच पवार हे ठाण्यात दाखल होत असल्याचे सांगण्यात येते. या दौऱ्यात ठाणे जिल्हा परिषद, पंचायत समिती, सात महापालिका आणि चार नगरपालिकांतील कारभार व यापैकी भविष्यात होणाऱ्या निवडणुकीत पक्षाचा परफार्मन्स उजवा राहण्यासाठी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना ते कामाला लागण्याचा संदेश देण्याची शक्यता आहे.
 
ठाणे जिल्ह्यातील सत्तापदे एकाच कुटुंबात अथवा विशिष्ट गटातील लोकांनाच देण्यामुळे सातत्याने काम करणाऱ्या कार्यर्कत्यांवर अन्याय होतो, अशा तक्रारीचा पाढा काही जणांकडून होण्याची शक्यता आहे. मुंबईशेजारी असलेल्या ठाणे जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या मंत्र्यांनी महिन्याकाठी दोन तासाचा वेळ दिला तर पक्षसंघटना अधिक सक्षमपणे बांधली जाऊ शकते अशी परिस्थिती आहे. पण पक्षसंघटनेच्या कार्यासाठी वेळ देण्यापेक्षा मंत्र्यांच्या मागेपुढे फिरणाऱ्या व मंत्रालयात घुटमळणाऱ्या नेत्यांना यावेळी लस टोचली जाण्याची चिन्हे आहेत.
 
शुक्रवारी सकाळी १० वाजता सुरू होणाऱ्या मेळाव्यात ग्रामीण भागातील तर दुसऱ्या सत्रात शहरी पट्ट्यातील कार्यर्कत्यांशी ते संवाद साधणार आहेत. शनिवारी पवार यांनी मंुबईतील राष्ट्रवादी भवनात कामगार नेत्यांची बैठक निमंत्रित केली असून, त्यात ते राष्ट्रवादीच्या दिवाळीनंतर ठाण्यात होणाऱ्या भव्य कामगार मेळाव्याची आखणी करतील, असे दिसते.
 

First Published: Sunday, October 2, 2011, 13:57


comments powered by Disqus