Last Updated: Wednesday, July 11, 2012, 12:21
www.24taas.com, कर्जत मुंबई - पुणे एक्सप्रेस वे ही राज्याची शान आहे. मात्र ज्या खालापूर तालुक्यातून हा एक्सप्रेस वे गेलाय त्याच गावांमधले नागरिक अक्षरशः तारेवरची कसरत करत नदी ओलांडतात. वर्षानुवर्षे कैफियत मांडूनही पूल बांधला जात नसल्यानं सरकारच्या संवेदनशीलतेवरच प्रश्नचिन्ह उभं राहतंय.
खालापूर तालुक्यात असलेल्या वनवे गावात नदीच्या पलीकडे जाण्यासाठी अशी तारेवरची कसरत करावी लागतेय. भरून वाहणा-या नदीपात्राच्या वरून भयावह प्रवास करणं गाक-यांची नशिबी आलंय. शाळकरी विद्यार्थी, कामगार, शेतकरी सगळ्यांनाच जीव धोक्यात घालून नदी पार करावी लागतेय. दोरावरून नदी पार करताना आयुष्याचा दोर तर कापला जाणार नाही ना ? अशी इथली भयानक परिस्थिती आहे.
या नदीवर पूल बांधण्याची चर्चा जरूर होते. अर्थात निवडणुकीच्या वेळी. प्रत्येक निवडणुकीत सगळेच उमेदवार पूल बांधण्याचं आश्वासन देतात.पण निवडणूक संपली की त्यांची पाठ फिरते आणि नागरिकांची अशी तारेवरची कसरत सुरू राहते. चार वर्षांपूर्वी कर्जत तालुक्यात होडी बुडून दहा महिलांचा मृत्यू झाला होता. तसाच धोका वनवे गावातही कायम आहे. मात्र सरकार त्यांची संवेदनशीलता बळी गेल्यानंतर दाखवणार का ? असा सवाल आता उपस्थित होतोय.
First Published: Wednesday, July 11, 2012, 12:21