वाघ्या जागच्या जागेवर, सुरक्षेत वाढ - Marathi News 24taas.com

वाघ्या जागच्या जागेवर, सुरक्षेत वाढ

Tag:  Waghya Kutara
www.24taas.com, रायगड किल्ला
 
रायगडावर वाघ्या कुत्र्याच्या पुतळ्याला आता पोलिसांचं सुरक्षा कवच वाढवण्यात आलंय. संभाजी ब्रिगेडनं हा पुतळा उखडून टाकल्यानंतर पुतळ्याच्या सुरक्षेत वाढ करण्यात आलीय.
 
आधी वाघ्या कुत्र्याच्या पुतळ्याला दोन पोलिसांचं संरक्षण होतं.पण संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी दोन पोलिसांना मारहाण करून पुतळा हटवला होता.... या घटनेनंतर आता एक अधिकारी आणि दहा पोलिसांची सुरक्षा वाघ्याभोवती ठेवण्यात आलीय. संभाजी ब्रिगेडचा वाघ्या कुत्र्याच्या पुतळ्याला आक्षेप आहे.वाघ्या कुत्रा शिवाजी महाराजांचा इमानी कुत्रा होता अशी आख्यायिका आहे.
 
पण त्याला शिवचरित्रात कोणताही आधार नसल्याचा संभाजी ब्रिगेडचा दावा आहे. त्यामुळे रायगडावर शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर तेवढ्याच उंचीचा असलेला वाघ्या कुत्र्याचा पुतळा हटवण्याची संभाजी ब्रिगेडची मागणी आहे.या वादातूनच संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी बुधवारी वाघ्या कुत्र्याचा पुतळा उखडून टाकला होता. रायगडावरच्या खड्यात हा पुतळा मिळाल्यानंतर प्रशासनानं तो पुन्हा बसवला. आता त्याला एक पोलीस अधिकारी आणि 10 पोलिसांचं संरक्षण पुरवण्यात आलंय.
 
रायगडावरील वाघ्या कुत्र्याचा समाधी पुतळा संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी हटवल्यानंतर संपूर्ण राज्यात तणाव निर्माण झाला होता. मात्र प्रशासनाने संभाजी ब्रिगेडच्या विरोधाला न जुमानता 24 तासांच्या आत पुतळा पुन्हा बसवून 73 कार्यकर्त्यांसह 10 गाड्या जप्त केल्या. मात्र संभाजी ब्रिगेडने शिवाजी महाराजांचा इतिहास चुकीच्या पद्धतीने खपवून घेतला जाणार नाही असा इशारा देत आक्रमक पवित्रा घेतलाय.

First Published: Friday, August 3, 2012, 17:52


comments powered by Disqus