उल्हासनगर महापालिकेत कायदे धाब्यावर - Marathi News 24taas.com

उल्हासनगर महापालिकेत कायदे धाब्यावर

www.24taas.com, ठाणे
 
उल्हासनगर महापालिकेतल्या लोकप्रतिनिधींनीच कायदे धाब्यावर बसवल्याचं उदाहरण समोर आलंय. या लोकप्रतिनिधींनी स्वतःच्या राजकीय सोयीनुसार गटनेत्यांच्या बेकयदेशीर नेमणुका केल्या आहेत. तसंच मुख्यालयातील दालनावर अनधिकृतरित्या ताबा मिळवून पैशांची उधळपट्टी सुरू केलीय. माहिती अधिकारात ही धक्कादायक बाब उघडकीस आलीय.
 
उल्हासनगर महापालिकेत सध्या लोकप्रतिनिधींकडून जनतेच्या पैशांची सर्रास उधळपट्टी सुरू आहे. कायदा धाब्यावर बसवून याठिकाणी नगरसेवकांनी दालनांचा ताबा घेतलाय. राष्ट्रवादीच्या गटनेतेपदी ज्योती कलानी यांची नोंद असताना मनोज लासी या स्वीकृत नगरसेवकाच्या नावाची पाटी राष्ट्रवादीच्या दालनात लावण्यात आलीय आणि तेच या दालनाचा वापर करत आहेत. तसंच बसपाच्या दोन सदस्यांनी साई पक्षाला पाठिंबा दिला असला तरी गट किंवा आघाडी म्हणून मान्यता नसतानाही या पक्षाला स्वतंत्र दालन देण्यात आलंय. ‘कायद्यानं वागा’ या सामाजिक संघटनेचे अध्यक्ष राज असरोंडकर यांनी माहिती अधिकारात हा प्रकार उघडकीस आणलाय.
 
बेकायदेशीररित्या कब्जा करण्यात आलेली दालनं पालिकेनं ताब्यात घेण्याची मागणी असरोंडकर यांनी केलीय. विशेष म्हणजे मालमत्ता विभाग आणि सार्वजनिक बांधकाम विभागानं कोणत्याही दालनाचा ताबा दिलेला नाही. यावरून महापालिकेची अवस्था ‘आंधळ दळतय आणि कुत्रं पीठ खातंय’ अशीच झाली आहे.

First Published: Saturday, August 4, 2012, 15:47


comments powered by Disqus