कोकणातील उध्वस्त कुटुंबांचा आक्रोश - Marathi News 24taas.com

कोकणातील उध्वस्त कुटुंबांचा आक्रोश

विकास गावकर, www.24taas.com, सिंधुदु्र्ग
 
तीन वर्षांपूर्वी कोकणात झालेल्या फियान वादळाच्या आठवणी आजही कोकणात ताज्या आहेत. अनेकांचे बेपत्ता झालेले नातेवाईक आजही परतलेले नाहीत. ते परत येतील या एकाच आशेनं त्यांच्या पत्नी, मुलं वाटेकडे डोळे लावून बसलेत. शासनाच्या निकषामुळे ही कुटुंब मदतीपासून वंचित आहेत.
 
तीन वर्षांपूर्वी आलेल्या फियान वादळानं कोकणातल्या अनेक मच्छिमारांचं जीवन उध्वस्त केलं, होत्याचं नव्हतं झालं... फियान वादळानं कुणाचा पती हिरावला तर कुणाचा बाप... त्यावेळी ज्यांचे मृतदेह सापडले त्यांना शासनानं मदत केली. परंतु खरा प्रश्न उरला तो या वादळात बेपत्ता झालेल्यांचा... तीन वर्षांनंतरही अनेक मच्छिमारांचा शोध लागलेला नाही. आपले नातेवाईक परत येणारच या आशेवर अनेकांनी अक्षरश: देवही पाण्यात ठेवलेत.
 
शासनही या लोकांना निकषाची सबब सांगतंय. बेपत्ता झालेल्यांना सहा वर्षांनंतर मृत घोषित करण्यात येतं. मात्र वादळात बेपत्ता झालेल्यांना तीन वर्षच झाल्यामुळे गरजूंना अजूनही मदत मिळालेली नाही. आणि दुसरीकडे बेपत्ता नातेवाईकांचा शोधही लागलेला नाही. शासनाच्या निकषात अडकलेले हे मच्छिमार शासनाला साद घालत आहेत. बेपत्ता मच्छिमारांना मृत घोषित करा आणि आम्हाला मदतीचा हात द्या. मात्र ही सादही शासनकर्त्यांपर्यंत पोहोचत नाही. हीच खरी त्यांची खंत आहे...
 
 

 
 

First Published: Wednesday, August 8, 2012, 09:15


comments powered by Disqus