येवा कोकण आपलाच असा - Marathi News 24taas.com

येवा कोकण आपलाच असा

झी २४ तास वेब टीम, रत्नागिरी
 
कोकणाच्या पर्यटनाला आता नाताळ आणि थर्टीफर्स्टचे वेध लागले आहेत.गोव्याबरोबरच विदेशी पर्यटकांनी यावर्षी कोकणाला अधीक पसंती दिली आहे.रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग मिळून सुमारे तीन लाख पर्यटक कोकणात दाखल होणार असून एम.टी.डी.सी.सह खासगी रिसॉर्टची आरक्षणं ‘फुल्ल’ झाली आहेत.
 
दरवर्षी नाताळ आणि थर्टीफर्स्टचा मुहूर्त साधत लाखो पर्यटक गोव्याकडे धाव घेत असतात. यामधे विदेशी पर्यटकांची संख्या अधिक असते. मात्र यंदा पर्यटकांचा ट्रेंड काहीसा बदलला आहे. विदेशी पर्यटक नाताळनिमित्त आत्तापासूनच कोकणात दाखल झाले आहेत. तारकर्ली, गणपतीपुळे, मुरूड, दापोली, रत्नागिरी येथील सर्व रिसॉर्ट २४ डिसेंबर ते पाच जानेवारी या कालावधीत फुल्ल झाली आहेत. सुमारे तीन लाख पर्यटक कोकणात येतील असा अंदाज वर्तवण्यात येतो आहे.
 
पर्यटन विकास महामंडळाकडे आरक्षण उपलब्ध नसल्यानं पर्यटकांनी खासगी रिसॉर्टकडे धाव घेतली आहे. पर्यटकांना अधिकाधिक सुविधा उपलब्ध करून देण्याबरोबरच कोकणचं सौंदर्य पहाण्याची संधीही उपलब्ध करून देण्यात येत आहे.गजबटाला कंटाळलेल्या विदेशी पर्यटकांनी शांत अशा कोकणच्या समुद्र किनाऱ्यावर आजपासूनच मुक्काम ठोकला आहे.गोव्यापेक्षा रत्नागिरीतील पर्यटनस्थळं स्वच्छ आणि सुंदर असून इथली शांतता मन प्रसन्न करणारी असते, अशा शब्दात विदेशी पर्यटक कोकणचं वर्णन करतात.
 

दरम्यान आता बीच फेस्टीव ,कासव महोत्सव, सह्याद्री महोत्सव अशा उपक्रमांनाही पर्यटकांची हजेरी लागणार असल्यानं पुढचे दहा दिवस कोकण पर्टकांच्या गर्दीनं  अक्षरश: फुलून जाईल.

First Published: Thursday, December 22, 2011, 04:36


comments powered by Disqus