नवी मुंबई महापालिका चिंतेत - Marathi News 24taas.com

नवी मुंबई महापालिका चिंतेत

www.24taas.com, नवी मुंबई
 
नवीमुंबईला अनधिकृत बांधकांमांचा विळखा बसला आहे. इथं बांधण्यात आलेल्या इमारतींमध्ये तीनशे अठ्ठेचाळीस बांधकामांसाठी ओसी घेण्यात आलेली नाही. अशा बांधकांमामुळं पालिका चिंतेत आहे. त्यामुळं आता याबाबत कडक कारवाईचे संकेत नवीमुंबई महापालिकेकडून देण्यात आले आहेत.
 
नवी मुंबईत मोठ्या प्रमाणात इमारतीचं बांधकाम करण्यात येत आहे. मात्र हे करताना बांधकाम व्यावसायिकांकडून महापालिकेच्या नियमांचं उल्लंघन झाल्याचं समोर आलं. इमारती उभारताना दाखवण्यात आलेलं काम आणि प्रत्यक्षात पूर्ण झालेलं काम यांत मोठी तफावत पाहायला मिळते. बांधकाम पूर्णत्वास आल्यावर त्यात अनधिकृत काम जास्त असल्यास पालिकेच्या नगररचनाविकास विभागाकडून ओसी मिळत नाही. नवीमुंबईत अशा तब्बल तीनशे अठ्ठेचाळीस इमारती आहेत. नेरुळ आणि वाशी याठिकाणी जवळपास शंभरहून अधिक बांधकामांना ओसी मिळालेली नाही.
 
यासाठी नगररचना विकास विभागाचे नियम अधिक कडक करण्याची गरज असल्याचं नवीमुंबईचे महापौर सागर नाईक यांनी सांगितलं. बांधकाम व्यावसायिक अशाप्रकारे पालिकेच्या नियमांकडे डोळेझाक करत असल्यामुळं यांत सामान्य ग्राहक भरडला जातो. आता पालिकेकडून नियम कडक करण्याचे बोललं जातं. मात्र तसं झाल्यावरही ते प्रत्यक्षात कितपत पाळले जातील याबाबत शंका उपस्थित करण्यात येते.

First Published: Tuesday, January 10, 2012, 13:40


comments powered by Disqus