Last Updated: Friday, January 20, 2012, 16:57
www.24taas.com, नवी मुंबई नवी मुंबईतील जीवनधारा अंतर्गत वॉर्ड सल्लागार समिती क्रीडा आणि नवी मुंबई क्रीडा संकुलातर्फे आयोजित क्रीडा महोत्सवाच्या उद्घाटनाचा सोहळा सचिन तेंडुलकरचे गुरु रमकांत आचरेकर यांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी ठाण्याचे पालकमंत्री गणेश नाईक यांनी रमाकांत आचरेकर यांचा पाच लाख ५५ हजार रुपये गौरव निधी आणि सन्मानचिन्ह देऊन गौरव केला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पालकमंत्री गणेश नाईक होते. यावेळी खासदार संजीव नाईक, आमदार संदीप नाईक, महापौर सागर नाईक, पोलीस उपाआयुक्त विजय पाटील, उद्योजक मोहन धारिया, नवी मुंबई स्पोर्टस असोसिएशनचे उपाध्यक्ष दिलीप राणे आदींसह अन्य मान्यवर उपस्थित होते. नवी मुंबई क्रीडा संकुलातर्फे १९९० पासून क्रीडा महोत्सवाचं आयोजन करण्यात येत आहे. या क्रीडा महोत्सवात १२२ पेक्षा अधिक महाविद्यालय आणि शाळांनी सहभाग घेतला होता. क्रीडा महोत्सवात १० हजारच्या जवळपास खेळाडू सहभागी झाले होते.
यावेळी रमाकांत आचरेकर यांचे लिखित भाषण वाचण्यात आले. गणेश नाईक यांच्या स्नेहापोटी सत्काराला उपस्थित राहिल्याचे आचरेकर यांनी नमुद केले. शासनाकडून कोणतीही मदत न घेता हा उपक्रम राबविल्याबद्दल आणि नवोदित खेळाडूंना व्यासपीठ उपलब्ध करून दिल्याबद्दल आचरकर यांनी आयोजकांचे कौतुक केले. आ. संदीप नाईक यांनी आपल्याकडे क्रिकेटचे धडे घेतल्याचा उल्लेख आवर्जुन यावेळी करून नवोदित खेळाडूंनी या क्रीडा महोत्सवातून प्रेरणा घेऊन आपली खेळातील प्रगती साधावी, असे आवाहन आचरेकर यांनी उपस्थित खेळाडूंना केले.
नवी मुंबईतील क्रीडा संकुलनाच्या मैदानावर २२ जानेवारी रोजी सायंकाळी ६ वाजता पालकमंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते स्पर्धेचा बक्षिस समारंभ होणार आहे. यावेळी भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार अजित वाडेकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
First Published: Friday, January 20, 2012, 16:57