Last Updated: Saturday, February 4, 2012, 17:25
www.24taas.com, रत्नागिरी उद्योगमंत्री नारायण राणे यांचे सुपुत्र आणि 'स्वाभिमान' संघटनेचे नेते नितेश राणे यांनी पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री अजित पवारांना आव्हान दिलं आहे. कोकणातल्या दंगलीबाबत आमच्याकडे पुरावे आहेत आणि राणेसाहेब योग्य माध्यमातून ते समोर आणतील. त्यामुळे अजित पवारांनी राजकीय संन्यास घेण्यास तयार राहावे असा इशारा नितेश राणे यांनी उपमुख्यमंत्र्यांना दिला आहे.
राणेंनी या दंगलीचे पुरावे दिल्यास संन्यास घेऊ असं प्रतिआव्हान अजित पवारांनी बीडमधून दिलं होतं. दुसरीकडे नितेश यांनी शिवाजी पार्कवरील सभा परवानगीच्या मुद्यावरुन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनाही पाठिंबा दर्शवला आहे.
दरम्यान कुडाळमधल्या वस्त्रहरणानंतर आता रत्नागिरीत नारायण राणे विरूद्ध भास्कर जाधव असा कलगीतुरा रंगला आहे. खासदार निलेश राणे यांनी काल भास्कर जाधव यांना टार्गेट केलं होतं. त्यानंतर आज नारायण राणे भास्कर जाधव यांचा मतदार संघ असलेल्या गुहागरमध्ये जाहीर सभा घेत आहेत. या सभेत भास्कर जाधव हेच राणेंचं प्रमुख टार्गेट आहे. यापूर्वी कुडाळमध्ये राणेंनी राजकीय वस्त्रहरण करत उपमुख्यमंत्री अजित पवार तसच आर.आर.पाटील यांच्यावर चांगलंच तोंडसुख घेतलं होतं.
त्यानंतर राणेंचं मानसिक संतुलन बिघडलं असल्याची टीका राष्ट्रवादी नेत्यांनी केली. अखेर शरद पवारांनीच यात हस्तक्षेप करून आपल्या नेत्यांना संयम बाळगण्याचं आव्हान केलं. मात्र राणेंना कोण आवरणार असा सवाल राष्ट्रवादीच्या नेत्यांनी उपस्थित केला आहे. त्यामुळे राणेंच्या आजच्या सभेकडे साऱ्यांचच लक्ष आहे.
First Published: Saturday, February 4, 2012, 17:25