वाळूमाफियांनी केलाय कहर... - Marathi News 24taas.com

वाळूमाफियांनी केलाय कहर...

www.24taas.com, रत्नागिरी
 
रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडमध्ये बेकायदा वाळू उपशाचा 'झी २४ तास'नं पुन्हा एकदा पर्दाफाश केला आहे. खेडच्या खाडीपात्रात सक्शन पंपाद्वारे खुलेआम वाळू उपसा सुरु आहे. पोलीस आणि महसूल प्रशासन यंत्रणा कारवाईचं सोंग करीत असल्याचं सिद्ध झालं आहे.
 
रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडमध्ये कायदा धाब्यावर बसवून सक्शन पंपाद्वारे वाळू उपसा सुरु आहे. सक्शन पंपाद्वारे वाळू उपशाला बंदी असताना खेडमधले वाळू माफिया मात्र खुलेआम वाळू उपसा करत आहेत. 'झी २४ तास'नं वेळोवेळी वाळू माफियांचा पर्दाफाश केला आहे. खेडमध्ये माफियांनी वाळू उपशासाठी मोठी यंत्रणाच उभी केली आहे.
 
'झी २४ तास'नं याबाबत माहिती दिल्यानंतर महसूल यंत्रणा जागी झाली. तहसीलदारांनी धडक कारवाई करीत वाळू उपसा करणाऱ्यांना जेरबंद केलं. तर लाखो रुपयांची यंत्रणाही सीलबंद केली. पोलीस प्रशासनानं एका निवृत्तीला टेकलेला हवालदार कारवाईसाठी तहसीलदारांसोबत दिला होता. यावरुन पोलीस वाळू उपसा रोखण्याबाबत किती गंभीर आहेत हे दिसून आलं.
 
वाळू माफियांवर कारवाई केल्यानंतर काही दिवस वाळू उपसा बंद होतो. मात्र सरकारी अधिकाऱ्यांची पाठ फिरली की पुन्हा वाळू उपशाचं काम दुप्पट वेगानं सुरु होतं. त्यामुळं वाळू माफियांचे गॉडफादर शोधून त्यांच्यावरच कारवाई करण्याची गरज निर्माण झाली आहे.
 
 
 
 
 

First Published: Saturday, February 25, 2012, 16:48


comments powered by Disqus