पोलिसांचा युतीच्या महामोर्चाला नकार - Marathi News 24taas.com

पोलिसांचा युतीच्या महामोर्चाला नकार

www.24taas.com, ठाणे
 

ठाणे भाजप शहर अध्यक्ष संदीप लेले यांनी उच्च न्यायालयात रिट अर्ज दाखल केला आहे. भाजप नगरसेविका सुहासिनी लोखंडे अपहरणप्रकरणी हेबियस कॉर्पस दाखल केला. ठाण्यात शिवसेना भाजप युतीच्या महामोर्चाला पोलीसांनी परवानगी नाकारली आहे.


पोलिसांनी कायदा आणि सुव्यवस्थेचे कारण देत युतीच्या महामोर्चाला परवानगी नाकारली. भाजपचे शहर अध्यक्ष संदीप लेले यांनी झी २४ तासशी बोलताना मोर्चा परवानगी नाकारण्यामागे राष्ट्रवादी काँग्रेसचे दबावतंत्र असल्याचा आरोप केला आहे. याआधी त्यांनी नगरसेविका सुहासिनी लोखंडे अपहरण केलं आता ते लोकशाही संघटनांना दाबू पाहत आहेत. तसंच कोणत्याही परिस्थितीत मोर्चा काढणारच असा निर्धार संदीप लेले यांनी व्यक्त केला आहे.



ठाण्यात महापौरपदासाठी जोरदार रस्सीखेच सुरू आहे. कोणत्याच पक्षाला बहुमत न मिळाल्यामुळं नगरसेवकांची पळवापळवी, फोडाफोडी तेजीत आहे. अपक्ष आणि छोट्या पक्षांच्या नगरसेवकांना आपल्या बाजुला वळवण्यासाठी राजकीय पक्ष साम दाम दंड नितीचा उपयोग करताना दिसतायेत. त्यातच भाजपच्या बेपत्ता नगरसेविका सुहासिनी लोखंडे यांचा अजूनही पत्ता लागलेला नाही.
 
लोखंडे यांचं आमदार जितेंद्र आव्हाड यांनी अपहरण केल्याचा आरोप युतीच्या नेत्यांनी केला आहे. त्यावरुन आव्हाड यांच्याविरोधात गुन्हाही दाखल करण्यात आलाय. नगरसेविकेच्या अपहरणाच्या विरोधात महायुतीनं पुकारलेल्या ठाणे बंदला काल हिंसक वळण लागलं होतं. आज अपहरणाच्या विरोधात महायुतीनं पुन्हा महामोर्चाचं आयोजन केलंय. टेंभीनाक्यापासून ते पोलीस आयुक्त कार्यालयावर दुपारी तीन वाजता हा मोर्चा काढण्यात येणारय.
 
कालच्या ठाणे बंदमुळं आधीच ठाणेकर वैतागले होते. त्यातच आजच्या महामोर्चामुळं काही गडबड तर होणार नाही ना अशी भीती ठाणेकरांमध्ये आहे.
 
 

First Published: Monday, March 5, 2012, 14:38


comments powered by Disqus