Last Updated: Saturday, November 19, 2011, 11:13
झी २४ तास वेब टीम, डोंबिवली 
अंबोलीतल्या घटनेप्रमाणेच डोंबिवलीतही एका महिलेची छेडछाड काढणाऱ्या गुंडानं जाब विचारणाऱ्या पतीला मारहाण केली. एव्हढ्यावरच न थांबता या गुंडानं त्या महिलेच्या पतीच्या बोटाचा चावा घेऊन बोटाचे दोन तुकडेही केले. दुर्दैवाची बाब म्हणजे भररस्त्यात हा प्रकार घडत असतांना कुणीही त्यांच्या मदतीला आलं नाही.
डोंबिवलीतल्या संगीता वाडी परिसरात नारळाचे होलसेल व्यापारी असलेल्या बिपीन दणाणी यांची पत्नी कविता दणाणी काही कामानिमित्त दुकानात जाण्यासाठी निघाल्या होत्या. त्यावेळी इथल्या झोपडपट्टीत राहणाऱ्या मारूती माढे उर्फ पिंट्या या रोडरोमियोनं कविता यांची छेड काढायला सुरूवात केली. कविता यांनी कसबसं दुकान गाठून झालेला प्रकार आपल्या पतीला सांगितला. त्यानंतर बिपिन दणाणी यांनी पिंट्याला याचा जाब विचारला असता त्यानं त्यांना अमानुष मारहाण केली. इतकच नव्हे तर दणाणी यांच्या डाव्या हाताचं बोट दातानं चावून तोडून टाकलं.
विशेष म्हणजे भर रस्त्यात हा प्रकार घडत असतांना बघ्यांपैकी कुणीही त्यांच्या मदतीला सरसावलं नाही. टिळकनगर पोलिसांनी याप्रकरणी पिंट्यावर गुन्हा दाखल केला असून ते त्याचा शोध घेत आहेत. या अशा प्रकाराने महिलांच्या सुरक्षेबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.
First Published: Saturday, November 19, 2011, 11:13