सामान्यांना आंबा 'अंबट'! - Marathi News 24taas.com

सामान्यांना आंबा 'अंबट'!

www.24taas.com, नवी मुंबई
 
नैसर्गिक संकटामुळं फळांचा राजा आंबा यंदा सामान्यांच्या आवाक्याबाहेर आहे. नवी मुंबईतल्या एपीएमसी मार्केटमध्ये रोज 30 ते 40 हजार पेट्या येत आहेत. मात्र अजून डझनाला किमान 400 रुपये मोजावे लागतायत. त्यामुळं आंबा खरेदी चैनीचं बनलंय.
 
फळांचा राजा यंदा सामान्यांच्या आवाक्याबाहेर आहे. डझनाला आंब्याचा दर 600 ते 900 रुपये इतका आहे. तर मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत 400 ते 500 रुपये डझन आंबा आहे. त्यामुळं आंबा खरेदीसाठी आलेल्या सुनंदा फुलपगार यांची निराशा झाली. त्यांच्यासारखीच अवस्था अनेकांची झालीय.
 
यंदा बाजारात हापूस कमी आहे. त्याला पर्याय म्हणून कर्नाटकचा स्वस्त हापूस घेण्याकडं ग्राहकांचा कल वाढतोय. येत्या पंधरा दिवसांत आंब्याची आवक आणखी वाढेल अशी अपेक्षा आहे. कमी उत्पादनामुळं यंदा सामान्यांसाठी आंबा आंबटच ठरलाय. आता आवक वाढून आंब्याचे दर सामान्यांच्या आवाक्यात येऊन त्याची चव कधी चाखायला मिळणार याचीच प्रतीक्षा सा-यांना आहे.

First Published: Saturday, May 5, 2012, 17:12


comments powered by Disqus