ठाकुर्ली दरोडाः सहा पोलिसांची 'झोप' उडाली - Marathi News 24taas.com

ठाकुर्ली दरोडाः सहा पोलिसांची 'झोप' उडाली

झी २४ तास वेब टीम, ठाकुर्ली
डोंबिवलीजवळ ठाकुर्ली शहरात रविवारी पहाटे सशस्त्र दरोडेखोरांनी केलेल्या हल्ल्यात माजी आमदार हरिश्चंद्र पाटील आणि नगरसेवक हर्षद पाटील जखमी झाले होते.  झी २४ तासने या प्रकरणाचा पाठपुरावा केल्यानंतर निष्काळजीपणाचा ठपका ठेवून मानपाडा पोलीस स्टेशनच्या सहा पोलिसांना बुधवारी निलंबित करण्यात आले. ठाणे ग्रामीणचे पोलीस आयुक्त के. पी. रघुवंशी यांनी ही माहिती दिली.
मानपाडा पोलीस स्टेशनच्या एएसआय वाय. एस. बागुल, हेडकॉन्स्टेबल एम. एच. निकम, पोलीस नाईक एल. एम. वाघ, पोलीस कॉन्स्टेबल के. के. शिर्के, पोलीस कॉन्स्टेबल के. के. ठाकूर आणि पोलीस कॉन्स्टेबल ए. आर. वाघेरे या सहा पोलिसांना निलंबित केल्याचे आयुक्त रघुवंशी यांनी सांगितले.
पोलीस दलाच्या निष्काळजीपणामुळे दरोडेखोरांची हिंमत वाढली आहे. दरोडा घालतेवेळी अडवणूक करणाऱ्या राजकीय नेत्यांवरच हल्ला करण्यापर्यंत त्यांची मजल गेली, असा आरोप स्थानिकांनी केला होता. त्यामुळे ठाणे ग्रामीण पोलीस दलाची प्रतिमा सुधारण्यासाठी तसेच दरोडेखोरांचा कायमचा बंदोबस्त करण्यासाठी सुरू केलेल्या मोहिमेचा एक भाग म्हणून सहा पोलिसांना निलंबित करण्यात आले असल्याचे आयुक्तांनी स्पष्ट केले.

First Published: Thursday, December 1, 2011, 11:59


comments powered by Disqus