पहिला पर्यटन जिल्हा सिंधुदुर्ग अजूनही मागास,The First Tourism district in Maharashtra still Backward

पहिला पर्यटन जिल्हा सिंधुदुर्ग अजूनही मागास

पहिला पर्यटन जिल्हा सिंधुदुर्ग अजूनही मागास

महाराष्ट्रातला पहिला पर्यटन जिल्हा म्हणून मोठा गाजावाजा करून मान्यता मिळविलेल्या कोकणातल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनेक पर्यटन प्रकल्प आजही अपूर्ण स्थितीत आहेत.

स्कूबा डायविंगसाठी सुमारे ५ कोटींचा निधी प्राप्त होऊनही गेल्या ५ वर्षात अधिकाऱ्यांच्या अनास्थेमुळं हे काम पुढं सरकू शकलेलं नाही. जागतिक पर्यटन दिनाच्या निमित्ताने सिंधुदुर्गवर हा खास रिपोर्ट……………

कोकणावर निसर्गानं जणू मुक्तहस्तानं सौंदर्याची उधळण केलीय, स्वच्छ निळाशार समुद्र, तितकेच मनमोहक समुद्रकिनारे, हिरवाईनं नटलेला परिसर, पावसाळ्यात उंचावरुन कोसळणारा फेसाळलेला धबधबा, या साऱ्या गोष्टींमुळे कोकण पर्यटकांना कायम खुणावतोय.
तारकर्लीचा समुद्र किनारा असो किंवा सिंधुदुर्गचा किल्ला, पर्यटकांचा सिंधुदुर्गकडे ओढा वाढतोय. स्कूबा डायव्हिंग या नव्या प्रकारामुळे पर्यटकांची पावलं आपसुकच सिंधुदुर्गकडे वळतायत.

मात्र नियोजनाअभावी सिंधुदुर्गचा पर्यटनदृष्ट्या म्हणावा तितका विकास झाला नसल्याचा आरोप होतोय. लोकप्रतिनिधी, अधिकारी आणि स्थानिकांमधल्या समन्वयाच्या अभावाचा फटका सिंधुदुर्गच्या पर्यटनाला बसतोय.

सिंधुदुर्गात विविध विकास प्रकल्पांना स्थानिकांच्या विरोधाची किनार लाभलीय. चिपी इथलं विमानतळ आणि वायगणितला सी वर्ल्ड प्रकल्प राबवताना स्थानिकांना विश्वास घेतलं जात नसल्याचा आरोप होतोय.

मोठा गाजावाजा करत तारकर्लीत स्कूबा डायव्हिंग प्रकल्प सुरु केला खरा. मात्र सरकार आणि अधिका-यांच्या नाकर्तेपणामुळे गेल्या ५ वर्षापासून हा प्रकल्प कासवगतीनं पुढे सरकतोय. त्यामुळं पर्यटकांमध्ये नाराजी आहे.

पर्यटनात सिंधुदुर्ग गोव्यालाही पर्याय ठरु शकतो हेही सा-यांना मान्य. असं असूनही रखडलेल्या प्रकल्पांमुळे सिंधुदुर्गवासीय आणि पर्यायाने कोकणवासियांची झोळी मात्र रिकामीच राहिलीय.


* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.

First Published: Friday, September 27, 2013, 18:44


comments powered by Disqus