शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक अडचणीत! Unauthorized construction by Shiv Sena MLA

शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक अडचणीत!

शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक अडचणीत!
www.24taas.com, झी मीडिया, ठाणे

ठाण्यातले आमदार प्रताप सरनाईक यांच्या दोन टॉवरमधले चार अनधिकृत मजले पाडण्यासाठी मुंबई हायकोर्टाने ठाणे महानगरपलिकेला हिरवा कंदील दाखवलाय. त्यामुळे आता महापालिका मजले पाडण्यासाठी कधी कारवाई करणार असा सवाल उपस्थित होतोय.

शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक सध्या चांगलेच अडचणीत आलेत. वर्तकनगरमध्ये बांधलेल्या छाबिया पार्क आणि विहंग अपार्टमेंट या इमारतींमधील चार अनधिकृत मजल्यांवर कारवाई करण्यास मुंबई हायकोर्टाने हिरवा कंदील दाखवलाय. मुळात नऊ मजल्यांची परवानगी असताना या इमारतींमध्ये 13 मजल्यांचं बांधकाम करण्यात आलं. तब्बल 22 हजार 486 चौरस फुटांचं अनधिकृत बांधकाम केल्याचंही उघड झाल्यानंतर नोटीसा बजावण्यात आल्या होत्या. या प्रकरणी मुख्यमंत्र्यांनी मनपा आयुक्तांना चौकशीचे आदेश दिले होते. त्यानुसार चौकशी करण्यात आली. मात्र याबाबत रहिवाश्यांनी कनिष्ठ न्यायालयात धाव घेतल्यानंतर कारवाईला स्थगिती मिळाली होती. या स्थगितीविरोधात ठाणे महापालिकेनं हायकोर्टात धाव घेतली होती. अखेरीस या इमारतींवर हायकोर्टाकडून कारवाईला हिरवा कंदील मिळाला. पुरते अडचणीत आलेल्या सरनाईक यांनी आता या प्रकरणात राजकारण असल्याचा आरोप केलाय.


सरनाईक यांनी उभारलेले अनधिकृत मजले पाडायलाच हवेत अशी आक्रमक भूमिका राष्ट्रवादीनं घेतलीय. कॅम्पाकोलाच्या कारवाईबरोबर अनधिकृत बांधकामांचा विषय सध्या चांगलाच चर्चेत असताना ठाण्यातील या प्रकरणात हायकोर्टानं कारवाईला हिरवा कंदील दिल्यानं आता ठाणे महापालिका कधी कारवाई करणार याकडे सर्वांचच लक्ष लागलंय

First Published: Friday, May 3, 2013, 22:20


comments powered by Disqus