Last Updated: Tuesday, December 18, 2012, 12:10
www.24taas.com, नागपूर यापुढे राज्यभरातील कोणत्याही मराठी – इंग्रजी माध्यमांच्या शाळा मुलाखती घेत असल्याचं तुम्हाला आढळलं तर तुम्ही त्याची तक्रार शिक्षण विभागाकडे करू शकता. कारण, शाळेच्या प्रवेशासाठी मुलांच्या आणि पालकांच्या मुलाखती बेकायदा, असल्याचं खुद्द शालेय शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा यांनी म्हटलंय. तसंच असं बेकायदा कृत्य करणाऱ्या शाळा व्यवस्थापनाला २५ हजार रुपये दंड ठोठावण्यात येणार आहे. तर दुसऱ्यांचा पुन्हा तोच गुन्हा करणाऱ्या शाळेला ५० हजार रुपयांचा दंड भरावा लागणार आहे, अशी माहिती शिक्षणमंत्र्यांनी विधानसभेत दिलीय.
दर्डा यांच्या म्हणण्यानुसार, लहान मुले आणि पालकांच्या मुलाखती घेण्यात येतात याबाबत अद्याप एकही रीतसर तक्रार सरकारकडे आलेली नाही. तरीही, ‘प्रवेशासाठी अशा मुलाखती घेणं बेकायदेशीरच आहे. लहान मुलांच्या मुलाखती घेणे हा कायद्याने गुन्हा आहे. तो गुन्हा ज्या शाळा करत असतील त्यांना आर्थिक दंड ठोठावण्यात येईल. त्यासाठी एक सक्षम अधिकारी नेमण्यात येईल’असं शिक्षणमंत्र्यांनी स्पष्ट केलंय.
तसंच, ‘शिक्षण हक्क हा केंद्र सरकारचा कायदा संमत झालेला आहे. या कायद्याची लवकरच अंमलबजावणी सुरु होणार आहे या कायद्यात अशा शाळांवर कठोर कारवाई करण्याची तरतूद आहे’ असंही शिक्षणमंत्र्यांनी सांगितलंय.
First Published: Tuesday, December 18, 2012, 09:44