Last Updated: Thursday, December 13, 2012, 11:07
www.24taas.com, नागपूर नागपूर अधिवेशनात विरोधकांनी घेतलेल्या आक्रमक पवित्र्याला त्याचपद्धतीने उत्तर देण्याचा प्रयत्न आज राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे करण्यात येणार आहे. विरोधकांच्या काळ्या पत्रिकेला उत्तर देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस आज विधानसभेत ‘सत्यपत्रिका’ सादर करणार आहे.
गुरुवारी सकाळी १०.३० च्या सुमारास या सत्यपत्रिकेचं सादरीकरण करण्यात येईल, अशी माहिती सूत्रांनी दिलीय. `सत्यमेव जयते` असं या पत्रिकेचं नाव आहे. या सत्यपत्रिकेत सर्व आरोपांचं खंडन करण्यात आल्याचा दावा राष्ट्रवादीनं केलाय. सिंचन प्रकल्पांबाबत विरोधकांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना या सत्यपत्रिकेत उत्तर देण्याचा प्रयत्न असेल. कंत्राटदारांसाठी विरोधी पक्षातचीन नेत्यांनी टाकलेला दबाव आणि विरोधी पक्षांच्या नेत्यांमुळे प्रकल्पांमध्ये करण्यात आलेले बदल याचीही माहिती या सत्यपत्रिकेद्वारे समोर आणण्यात येईल. अजित पवारांना टार्गेट करण्याच्या विरोधकांच्या राजकारणाला हा राष्ट्रवादीचा काटशह असेल.
दरम्यान, सिंचन घोटाळ्यावर श्वेतपत्रिका, श्वेतपत्रिकेवर काळी पत्रिका यांच्यानंतर पिवळ्या पत्रिकेचाही नंबर लागलाय. माजी राज्यमंत्री आणि विदर्भातले नेते मधुकरराव किंमतकर यांनी सिंचनाची पिवळी पत्रिका काढलीय. सिंचनावरच्या श्वेतपत्रिकेतल्या उणिवांवर यात बोट ठेवण्यात आलंय. विदर्भातल्या वाढत्या अनुशेषाबद्दल सरकारवर टीका करण्यात आली आहे.
First Published: Thursday, December 13, 2012, 09:41